Breaking News
मुंबईः विविधतेने नटलेल्या देशात सांस्कृतिक एकोपा असला आणि काही सण उत्सव सारखे असले तरी सोन्याचा भाव मात्र एक नाही. सोन्याचा दर शहराप्रमाणे आणि राज्याप्रमाणे बदलतो. जळगावमधला सोन्याचा भाव आणि अहमदाबादमधला सोन्याचा दर यात फरक पडतो. त्यामागे वाहतुकीचा खर्च हे मोठं कारण आहे. वाहतुकीचा खर्च जोडल्यानंतर प्रत्येक राज्यात सोन्याचा दर बदलतो. देशातर्ंगत सोन्याच्या भावात कमालीचा फरक पडतो. दिल्ली आणि चेन्नई किंवा मुंबई आणि कोलकत्ता इथल्या सोन्याच्या दरात बरीच तफावत दिसून येते; परंतु आता हा फरक लवकरच दूर होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये बुलियन एक्स्चेंज सुरू झालं. त्यामुळे संपूर्ण देशात सोन्याचा एकच दर निश्चित होईल. वन नेशन, वन गोल्ड रेट’ योजना लवकरच लागू होईल. परिणामी, देशभरात कुठेही सोनं घेतलं तरी त्याच्या दरात फार मोठा परिणाम दिसून येणार नाही. इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज’च्या माध्यमातून सोन्याची देवाणघेवाण करता येईल. याद्वारे सोन्या-चांदीची आयात करता येईल. या ठिकाणी 125 टन सोन्याची तसंच एक हजार टन चांदीची क्षमता आहे. सराफा व्यापारासाठी हा पारदर्शक प्लॅटफॉर्म असेल. इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज’मध्ये तीन वॉल्ट असतील.
आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंजच्या मदतीने केवळ पात्र ज्वेलर्सच आयात करू शकतील. पात्र ज्वेलर्स बनण्यासाठी आयएफएससी’मध्ये नोंदणी आवश्यक आहे. आयात करण्यासाठी किमान 25 कोटींची निव्वळ संपत्ती असणं आवश्यक आहे. याशिवाय, मागील तीन वर्षांच्या उलाढालीपैकी 90 टक्के भाग हा सराफा व्यवसायाचा असावा. सुरुवातीला सकाळी नऊ ते दुपारी साडे तीनवाजेपर्यंत व्यापाराला परवानगी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसात 22 तासांपर्यंत ट्रेडिंग देखील शक्य आहे. पात्र ज्वेलर्सना 11 दिवसांची आगाऊ पेमेंट सुविधा मिळेल. सर्व करार आणि सेटलमेंट डॉलरमध्ये सूचीबद्ध केले जातील.
या योजनेमुळे सोने आयातीसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म मिळेल. यामुळे भारत जागतिक सराफा बाजाराशी जोडला जाईल. येणार्या काळात सोन्याचा भाव काय असावा हेही भारत ठरवेल. यामुळे देशात सराफा आयातीचा नवा मार्ग खुला होणार आहे. इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज’द्वारे आयात स्वस्त होऊ शकते. गुणवत्तेसह किंमत आणि पारदर्शकतेची हमी ही सराफा व्यापार्यांना मिळणार आहे. शिवाय भविष्यात सोन्याचा दर वाढला तरी स्वस्त दराचा फायदा ग्राहकांना मिळू शकेल. बुलियन एक्सचेंजमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या एका प्लॅटफॉर्मवर येतील. त्याचा लाभ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांना होईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai