Breaking News
आरोपीस तीन तासात अटक
नवी मुंबई ः नशायुक्त पदार्थ खायला देवून आरोपीने परिचयाच्या 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना वाशी येथे घडली. वाशी पोलीसांकडे या संदर्भातला गुन्हा वर्ग होताच तातडीने तपासाची सुत्रे हलवून केवळ तीन तासात वडाळा येथून आरोपीच्या मुसक्या आवळण्यास वाशी पोलीसांना यश आले आहे.
आरोपी करिम उर्फ नझिम उर्फ बिडी कासीम सय्यद (28) व पिडीत तरुणी एकमेकांचे परिचयाचे असून गोवंडी येथे राहतात. 27 जुलै रोजी आरोपीने तरुणीला परिसरातील हुक्का पार्लरमध्ये नेऊन हुक्का पाजला. तसेच गुटख्यातून नशायुक्त पदार्थ खायला दिला. तरुणीला नशा आली असता तिला रात्री 1 वा. वाशीतील एका लॉजवर आणून तिच्या ईच्छेविरुद्ध जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवले. सदर तरुणीला चक्कर येत असल्याने तिला सकाळी 8 वा. पुन्हा शिवाजीनगर परिसरात आणून सोडले. शुद्धीवर आल्यावर तरुणीला मानसिक धक्का बसला. त्यामुळे तिने तिच्या राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तिला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार दिली. सदर गुन्हा वाशीत घडल्याने तो वाशी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला. 12 ऑगस्टला गुन्हा वर्ग होताच पोलीसांनी तपासाची सुत्रे हलवली. पोलीस उपआयुक्त परि-1 विवेक पानसरे, सहायक पोलीस आयुक्त डी.डी.टेळे, यांच्या सूचनेप्रमाणे व वरिष्ठ पोलिस निरिक्षक रमेश चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रमोद तोरडमल(गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरिक्षक कमलाकर सोनटक्के, पोहवा संजय भाले, पोना संजय पाटील व पोशि लिंबाजी कायपलवाड यांनी आरोपीचा शिवाजीनगर, गोवंडी परिसरात शोध घेतला मात्र तो सापडला नाही. आरोपी वडाळा येथे लपून बसल्याची माहिती गुप्तबातमीदारामार्फत मिळताच पोलीसांनी सापळा लावून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. गुन्हा वर्ग झाल्यावर अवघ्या तीन तासात पोलीसांना आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले. आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याचे मान्य केले. गुन्ह्याचा पुढील तपास मसपोनि खरटमल या करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai