बिबट्याची कातडी विक्री करणार्‍यास अटक

नवी मुंबई : बिबट्या वाघाची कातडी विक्री करण्यासाठी खारघर परिसरात आलेल्या व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने सापळा लावून अटक केली आहे. आश्रप चिपोलकर (52) असे या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेली 20 लाख रुपये किंमतीची  बिबट्या  वाघाची कातडी जप्त  केली आहे.  

खारघर सेक्टर-2 भागात एक व्यक्ती  बिबट्या  वाघाची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-3च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप कदम, पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवसे, भुषण शिंदे, सुनिल शिंदे आदींच्या पथकाने वनविभागाच्या अधिकार्‍यांसह गत 30 जुलै रोजी सायंकाळी खारघर सेक्टर-2 भागात सापळा लावला होता. यावेळी त्या भागात संशयास्पदरित्या आलेल्या आश्रप चिपोलकर याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळ असलेल्या सॅक-बॅगेची तपासणी केली असता, सदर बॅगेमध्ये 20 लाख रुपये किंमतीचे  बिबट्या वाघाची कातडी आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी त्याला  बिबट्या वाघाची कातडी बेकायदेशीरपणे बाळगल्या प्रकरणी अटक करुन बिबट्याची कातडी जप्त केली. आश्रप चिपोलकर याच्यावर खारघर पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याने सदर  बिबट्याचे कातडे कुठून व कुणाला विक्री करण्यासाठी आणले होते, व यात आणखी कुणाचा सहभाग आहे याचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त तुषार दोषी यांनी दिली.