फिफाचा भारतासोबत आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 02, 2022
- 529
भारतात फुटबॉलप्रेम रुजविण्यासाठी प्रयत्नशील
नवी मुंबई ः 17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 आयोजित करण्याचा बहुमान यावर्षी भारताला लाभलेला असून या स्पर्धेतील 10 सामने नवी मुंबईतील डॉ.डि.वाय.पाटील स्टेडियम मध्ये संपन्न झाले. विशेष म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामनाही नवी मुंबईत संपन्न झाला. यावेळी याच मैदानावर अंतिम सामन्यापूर्वी फिफा आणि केंद्र सरकारच्या शिक्षण विभागामध्ये फुटबॉल खेळाच्या विकासाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्वाचा सामंजस्य करार करण्यात आला.
स्पर्धेचे यजमान शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने खेळाडू व क्रीडाप्रेमी रसिकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. तसेच शहरात फुटबॉल वातावरण निर्मितीसाठी चित्रभिंती, शिल्पाकृती, चित्ररथ, बलुन्स, शाळांमधील उपक्रम अशा विविध माध्यमांचा उपयोग करण्यात आला. स्पर्धेच्या सामन्यांपूर्वी संघांना सराव करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 19 ए नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाला विविध देशांच्या संघांनी प्रथम पसंती दिली. स्पेन, चीन, मलेशिया अशा विविध देशांच्या संघांनी फुटबॉल मैदानावरील हिरवळीचे व तेथील व्यवस्थेचे कौतुक केले. याच मैदानावर रविवारी अंतिम सामन्यापूर्वी फिफा आणि केंद्र सरकारच्या शिक्षण विभागामध्ये फुटबॉल खेळाच्या विकासाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्वाचा सामंजस्य करार झाला. भारत सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच फिफाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जियानी इन्फॉटिनो यांनी सामंजस्य कराराचे माहितीपत्र अनावरण केले. याप्रसंगी केंद्रीय गृह व क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर तसेच केंद्र व राज्य शासनाचे संबंधित विभागांचे अधिकारी आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
फुटब़ॉलच्या माध्यमातून मुलांमध्ये जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी फिफाच्या वतीने जागतिक पातळीवर फुटबॉल फॉर स्कुल’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून शैक्षणिक उपक्रमांमध्ये फुटबॉल खेळातून सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला जात आहे. भारतातील 2.5 कोटी मुलांना सोबत घेऊन हा उपक्रम राबविला जात असून त्याबाबतचा सामंजस्य करार कार्यक्रम नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणामध्ये ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. भारतातील मुलांमध्ये फुटबॉल खेळात उंची गाठण्याची क्षमता असून ही मुले फुटबॉलमध्ये भारताचा नावलौकिक उंचावतील असा विश्वास यावेळी फिफाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जियानी इन्फॉटिनो यांनी व्यक्त केला. फुटबॉलच्या शास्त्रशुध्द प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण, विकास आणि सक्षमीकरण असे तिन्ही उद्देश साध्य होतील असेही ते म्हणाले.
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील 10 क्रीडा शिक्षक तसेच 50 विद्यार्थी व 50 विद्यार्थिनींना फुटबॉल फॉर स्कुल या उपक्रमाचा शुभारंभ होताना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्याची प्रात्यक्षिके मान्यवरांच्या समोर सादर करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाचे कौतुक सर्वच मान्यवरांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai