संविधान दिनानिमित्त निबंध, वक्तृत्व व घोषवाक्य स्पर्धा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 14, 2022
- 920
नवी मुंबई ः संविधान दिनाचे औचित्य साधून एक अभिनव उपक्रम 26 नोव्हेंबर रोजी राबविण्यात येत आहे. भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारीत करणारी आहेत. यादृष्टीने भारतीय संविधानाविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जाणीव जागृती व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त निबंध, वक्तृत्व व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याकरिता आयोजित या स्पर्धांकरिता (1) भारतीय संविधानाचे महत्त्व, (2) माझे संविधान, माझा अभिमान आणि (3) संविधान निर्मिती आणि बाबासाहेब - असे तीन विषय देण्यात आलेले आहेत.
‘निबंध स्पर्धा’ मध्ये या तीन विषयांपैकी एका विषयावर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत निबंध सादर करता येतील. 4 गटांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात येत असून इ. 5 वी ते 8 वी चा प्राथमिक शालेय गट, इ. 9 वी व 10 वी चा माध्यमिक शालेय गट यांच्या स्पर्धा आयोजनाचे नियोजन नमुंमपा शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन व खुल्या गटाच्या स्पर्धांचे नियोजन समाजविकास विभागामार्फत करण्यात येत आहे. निबंधाकरिता कमाल शब्दमर्यादा प्राथमिक शालेय गटाकरिता 300 शब्द, माध्यमिक शालेय गटाकरिता 1000 शब्द, महाविद्यालयीन गटाकरिता 1000 शब्द व खुल्या गटाकरिता 2000 शब्द इतकी आहे. ‘घोषवाक्य स्पर्धा’ प्राथमिक शालेय गट, माध्यमिक शालेय गट, महाविद्यालयीन गट तसेच खुला गट या चारही गटांमध्ये आयोजित करण्यात आली असून संविधानविषयक मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेतील 1 घोषवाक्य स्पर्धक सादर करू शकतात. ‘वक्तृत्व स्पर्धा’ या इ. 5 वी ते 8 वी चा प्राथमिक शालेय गट, इ. 9 वी व 10 वी चा माध्यमिक शालेय गट अशा दोन गटात घेण्यात येणार असून मराठी अथवा हिंदी भाषेतील सादरीकरणाचा कालावधी कमाल 5 मिनिटे असणार आहे. नमुंमपा शिक्षण विभागामार्फत वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन करण्यात येत असून प्रत्येक गटातील निवडक स्पर्धकांची अंतिम फेरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दि. 25 नोव्हेबर रोजी संपन्न होणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शालेय गटांसाठी तिन्ही स्पर्धा आयोजनाची संपूर्ण कार्यवाही नमुमपा शिक्षण विभाग यांच्यामार्फत होत असून स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी खुशाल चौधरी यांचेशी 9867922415 या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.
महाविद्यालयीन तसेच खुल्या गटासाठी निबंध आणि घोषवाक्य स्पर्धा आयोजनाची कार्यवाही समाजविकास विभागामार्फत होत असून या स्पर्धेतील सहभागाकरिता स्पर्धकांनी आपले निबंध व घोषवाक्य 21 नोव्हेंबर 2022 रोजी, सायं. 5 वा. पर्यंत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ग्रंथालय, सेक्टर 15, ऐरोली येथे अथवा समाजविकास विभाग, पहिला मजला, बेलापूर भवन, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर येथे सादर करावयाचे आहेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी श्री. दशरथ गंभिरे यांचेशी 9702309054 या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai