Breaking News
पनवेल ः पनवेल महापालिकेने ग्रामस्थांवर लादलेल्या मालमत्ताकराविरोधात नवी मुंबई 95 गावं नैना व इतर प्रकल्पग्रस्त समिती व संलग्न संस्थांसह ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मालमत्ताकराविरोधात खारघर परिसरातील प्रकल्पग्रस्त गावातील ग्रामस्थ धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची माहिती देण्यासाठी नवी मुंबई 95 गावं नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या रविवारी (ता.11) कोपरा गावातील समाज मंदिरात बैठक घेण्यात आली.
समितीचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर यांनी पनवेल महापालिकेची स्थापना करताना ग्रामीण भागातील ग्राम पंचायतीचा समावेश करू नये, असे ग्रामस्थांची मागणी होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रामपंचायत काळात कौलारू घरांना ऐंशी पैसे चौरस मीटर प्रमाणे मालमत्ता कर लावला जात असे, मात्र पालिकेने या विषयी अभ्यास न करता कौलारू घरांना 28 रुपये दराने मालमत्ता कर लावल्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. तसेच आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह आहे.
पालिकेच्या वतीने 29 गावात लावण्यात आलेल्या मालमत्ताकराच्या विरोधात होणार्या धरणे आंदोलनात पनवेल पालिका हद्दीतील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार आहे. तसेच दररोज विविध ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांचा देखील यात सहभाग असणार आहे. मालमत्ताकराचा विरोधात काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या हा विषय न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे पालिका आयुक्त गणेश देशमुख यावर चर्चा करत नाही. मात्र न्यायालयाने मालमत्ता कर कमी करावा, याविषयी मत व्यक्त केले नाही. केवळ पळवाटा म्हणून या विषयावर पालिका टाळाटाळ करीत असल्याचे अॅड. सुरेश ठाकूर, यांनी सांगितले.
पालिकेने गेल्या पाच वर्षात गाव आणि सिडको वसाहतीत कोणत्याही प्रकारचे विकासकामे केलेली नाहीत. उद्यान विकसित करण्यासाठी करोडोची निविदा मंजूर केली. अनेक गावात नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी मालमत्ता कर कमी करावा, यासाठी हे आंदोलन केले जात आहे. - रमाकांत पाटील, ग्रामस्थ, मूर्बी गाव
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai