Breaking News
नवी मुंबई ः हेरॉईन बाळगल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 लाख 27 हजार 500 रुपयांचे 84 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. आरोपींनी या पूर्वीही असेच गुन्हे केले आहेत का? याचा तपास सुरु आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
अबू बटकर सिद्दिकी, मोहम्मद अक्रम, नंदू सुग्रमण्यम आणि नसीर मुसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी केरळ राज्यात विविध ठिकाणी राहणारे आहेत. ही कारवाई एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या मार्गदर्शखाली करण्यात आली. मँफको मार्केट परिसरात हेरॉईन विकण्यासाठी काही इसम आले आहेत अशी माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक वसिम शेख, निलेश शेवाळे आणि अन्य पोलीस कर्मचार्यांचे पथक संशयित परिसरात धाडले.
युपी कोल्ड स्टोअरेज सेक्टर 18 येथे सापळा लावण्यात आला. तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री आठच्या सुमारास खबरीने दिलेल्या माहिती नुसार संशयित व्यक्ती आढळून आल्या. त्या सर्वांना ताब्यात घेत थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता हेरॉईन हा पदार्थ आढळून आला. हा अमली पदार्थ हेरॉईनच आहे याची खात्री तज्ञांच्या कडून करून घेतल्यावर आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 21 तारखेपर्यत पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai