Breaking News
नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीमधून प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघा सख्या भावांना नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. तसेच पावणे चार लाखांचा गुटखा जप्त केला आहे.
रबाळे एमआयडीसीतील भीमनगरमध्ये राहणारे शिवशंकर मधेसिया (26) व सुजित मधेसिया (22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी टेम्पोमधून प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आणल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या पोलिसांच्या पथकाने शनिवारी (ता.1)पहाटे रबाळे भीमनगर येथील श्री गणेश रिव्हेट्स ॲण्ड फास्टनर्स कंपनीसमोर टेम्पोची तपासणी केली असता त्यात 3 लाख 85 हजार रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा पानमसाला, सुगंधित तंबाखूच्या पाकिटांचा साठा आढळून आला आहे. तसेच या दोघांनी भिवंडी येथे राहणाऱ्या अब्दुला, बिलाल, राजीक अब्दुला, उस्मान बिलाल आणि सलमान यांच्याकडून गुटख्याचा साठा आणल्याची माहिती समोर आली असून अमली पदार्थ विरोधी पथकाकडून त्यांचा शोध सुरु आहे.
या कारवाईत अटक केलेल्या शिवशंकर मधेसिया याला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी डिसेंबर महिन्यामध्ये गुटख्याचा साठा करून ठेवल्याप्रकरणी अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी शिवशंकर याच्या घरातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुमारे 1 लाख रुपये किमतीचा गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला होता. या गुह्यात जामिनावर सुटल्यानंतर शिवशंकरने पुन्हा गुटख्याची तस्करी करण्यास सुरुवात केली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai