Breaking News
आरोपी रिक्षा चालक अटकेत
नवी मुंबई ः अडवली भुतवली गावाजवळ डोंगराळ भागात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या हत्येच्या गुन्ह्याची उकल झाली असून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्याची पार्श्वभूमी समोर आल्यावर आरोपीवर बलात्कार कलम अतिरिक्त लावण्यात आले आहे. मात्र अद्याप मयत महिलेची ओळख पटलेली नाही.
मोहम्मद अहमद मोहम्मद अली राईन असे अटक आरोपीचे नाव आहे. 22 मार्चला तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अडवली भुतवली गावाजवळ डोंगराळ भागात निर्जनस्थळी एक अनोळखी अंदाजे पस्तिशीच्या महीलेचा मृतदेह आढळून आला होता. मयत महीलेच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात इसमाने सिमेंट काँक्रीटचा दगड मारून ठार मारल्याचे दिसून येत होते. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद झाला होता. याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु होता. या तपासकामी स्वतंत्र पाच पथके तयार करण्यात आली होती. घटनास्थळ परिसरातील सलग तीन दिवसाच्या सिसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून संशयीत वाहनांच्या नोंदी घेउन त्यांची छाननी केली. त्यात एका रिक्षा मधुन एक महीला व रिक्षा चालक असे घटनास्थळी जात असल्याचे दिसुन आले.
सदर सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे मागोवा घेउन संबधीत रिक्षाचा नंबर प्राप्त केला. त्याचा शोध घेतला असता हि रिक्षा मोहम्मद अहमद मोहम्मद अली राईन (वय 36 वर्ष यास शिळफाटा, ठाणे) याची असल्याचे समोर आले. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना आरोपीने दिलेल्या माहितीनुसार तुर्भे इंदिरा नगर परिसरातून प्रवासी शोधत असताना सदर महिला प्रवासी म्हणून आरोपीच्या रिक्षात बसली. पुढे अडवली भुतवली परिसरातील निर्जन ठिकाणी आल्यावर मयत महीले सोबत आरोपीने शरीर संबंध ठेवले व त्या मोबदल्यात मयत महीलेने आरोपीकडे एक हजार रुपयाची मागणी केली परंतु सदर रक्कम देण्यास आरोपीने नकार देताच त्यांच्यामध्ये वाद झाला या वादामध्ये आरोपीने या महीलेला ढकलून खाली पाडले व शेजारीच पडलेली एक सिमेंटची वीट तिच्या डोक्यात घालुन तिला जिवेठार मारले. आरोपीवर सुरवातीला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्याने दिलेल्या कबुली नंतर बलात्काराचा हि गुन्हा त्याच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. आरोपीने माहिती दिली असली तरी गुन्ह्याचा तपास थांबलेला नाही तसेच अद्याप मयत महिलेची ओळख पटलेली नाही. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai