Breaking News
नवी मुंबई : बहिरे आणि मुक्यांना आर्थिक मदत जमा करण्याच्या बहाण्याने वस्तीत फिरून उघडा दरवाजा असलेल्या घरात घुसून लॅपटॉप व मोबाइल फोनची चोरी करणाऱ्या एका महिलेसह तिघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक तरुण हा मुका असल्याचे भासवून लोकांकडून सहानुभूती मिळवून चोऱ्या करत असल्याचे तपासात आढळून आले आहे. शिवराजा डी.टी.तिपेशा उर्फ शिवराजा तिपेशा वडार (18), अनाप्पा कुपाण्णा वडार (40) व सुंद्र मांझा वडार उर्फ सुंदरमा मांझा (40) अशी या तिघांची नावे असून या तिघांनी रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेले चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील चार लॅपटॉप व दोन मोबाइल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. हे त्रिकुट कर्नाटकातील भद्रावती भागात राहण्यास असल्याचे तसेच, केवळ चोरी करण्यासाठी ते कर्नाटक येथून मुंबईत येत होते.
रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरातून लॅपटॉप व मोबाइल फोन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. डी. ढाकणे यांच्या अधिपत्याखालील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी या भागात सातत्याने नजर ठेवली होती. यादरम्यान एक महिला व दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे मुके आणि बहिऱ्यांच्या मदतीसाठी आर्थिक मदत जमा करण्यासाठी चॅरिटीची कागदपत्रे आढळून आली. ते मुके आणि बहिऱ्यांसाठी आर्थिक मदत जमा करण्याच्या बहाण्याने फिरून उघड्या घरामध्ये घुसून लॅपटॉप व मोबाइल फोनची चोरी करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांतील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली असता, हा गुन्हा त्यांनीच केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करून कर्नाटकातील भद्रावती येथून चार लॅपटॉप व दोन मोबाइल फोन हस्तगत केले. तसेच, मुका असल्याचा बहाणा करणाऱ्या आरोपीलाही पोलिसांनी बोलते केले. या तिघांनी रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत लॅपटॉप चोरीचे केलेले सात गुन्हे उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. डी. ढाकणे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai