Breaking News
गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोकाट
नवी मुंबई ः एप्रिलमध्ये मिळालेल्या गुप्त माहितीवरुन वनसंरक्षक दलाने समुद्र शिंपल्याने भरलेले दोन टेम्पो जप्त केले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारावर तळोजा एमआयडीसी येथील एका कंपनीला सील करण्यात आले होते. परंतु, या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना शोधुन काढण्यास संबंधित प्राधिकरणांना अपयश आले आहे.
पनवेल येथील वनसंरक्षक दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी पाठलाग करुन दोन वाहनांना ताब्यात घेतले असता त्यांना ती वाहने समुद्र शिंपल्यांनी भरलेले असल्याचे आढळले. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 च्या अनुसूची 4 मध्ये समुद्र शिंपल्यांची वाहतुक, साठवणुक बंदी असल्याने संबंधित वाहने ताब्यात घेवून वन अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. ही कारवाई वन अधिकारी संजय वाघमोडे, कुलदीप पाटकर आणि धनेश्वर सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली केली होती. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तळोजा एमआयडीसीतील युनायटेड मड केमिकल प्रा. लि. या कंपनीवर धाड टाकली असता तेथेही शेकडो टन समुद्र शिंपले आढळून आल्या. या समुद्र शिंपल्या आखाती देशात तेल विहीरीतून ऑईल काढताना वापरण्यात येतात. तसेच त्याचा वापर कॅल्शिअम, औषधे व सौंर्द्य प्रसाधने बनविण्यासाठी केला जातो.
या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे रोह्यातूनही समुद्री शिंपले जप्त करण्यात येऊन तेथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथील तपास जिल्हा वनसंरक्षक अधिकारी करत असून म्हणावे तसे यश संबंधितांना मिळाले नसल्याचे बोलले जात आहे. संबंधित कंपनीकडून कॅल्शियम कार्बोनेट या संज्ञेने सदर माल हा आखाती देशात निर्यात केला जात असून जेएनपीटी व मुद्रा पोर्ट मधून अशा निर्यात करणाऱ्या कंपन्यांचा तपशील मिळवल्यास याचे देशभरातील धागेदोरे हाती लागतील असे बोलले जात आहे. राजस्थानमधील अंबाजी इंडस्ट्रीयल एरियातील प्रो-एक एनर्जी प्लांट लि. कंपनी कॅल्शियम कार्बोनेट निर्यात करत असल्याची माहिती वनसंरक्षक खात्याला मिळाली असल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून कळत आहे. याबाबत तपास अधिकारी संजय वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणाचा तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लवकरच आम्ही आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे सांगून गुन्हेगारांना जास्तीतजास्त शिक्षा कशी मिळेल याकडे लक्ष देत असल्याचेही सांगितले. परंतु, सुरु असलेली कारवाई ही या गुन्ह्यातील छोट्या गुन्हेगारांविरुद्ध असून मुख्य आरोपींपर्यंत अजूनही कायद्याचे हात पोहचले नसल्याचे दिसते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai