लाचखोर शिधावाटप अधिकार्‍याला अटक

नवी मुंबई ः रेशनिंग दुकानावर कारवाई न करण्याबाबत खासगी व्यक्तीमार्फत वाशीच्या शिधावाटप कार्यालयातील सहाय्यक शिधावाटप अधिकारी विनोद लाडे यांना 30 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

वाशीच्या शिधावाटप कार्यालयातील सहाय्यक अधिकारी विनोद लाडे तुर्भे स्टोअर्स परिसरातील श्रीगणेश रेशनिंग दुकानाच्या तपासणीसाठी गेले होते. मात्र त्यांना रेशनिंग दुकान बंद आढळल्याने दुकानावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दुकानावरील कारवाई टाळण्यासाठी रेशनिंग दुकानदाराने तडजोड करण्याची विनंती केली असता विनोद लाडे यांनी गोविंद वावीया या खासगी व्यक्तीमार्फत 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार या दुकानदाराने या अधिकार्‍याची लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार बुधवारी सापळा रचून गोविंद वाबीया या खासगी व्यक्तींच्या माध्यमातून 30 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या व्यक्तीची अधिक चौकशी केली असता ही लाच रेशनिंग अधिकारी विनोद लाडे यांच्या सांगण्यावरून घेतल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार सहाय्यक अधिकारी विनोद लाडे यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रुमेश चव्हाण, पोलिस निरीक्षक धनाजी जळक व त्यांच्या पथकाने केली.