पौष्टिक आणि खमंग रेसिपी
- by मोना माळी-सणस
- Jun 17, 2023
- 425
कांदा पोहे
कांदा पोहे हा महाराष्ट्रातील एक उत्तम नाश्त्याचा पदार्थ आहे. कुठलाही सण किंवा कार्यक्रम असल्यास हमखास पोहे केले आणि खाल्ले जातात. पोहे खूप प्रकारे बनवता येतात. त्यातला एक अस्सल प्रकार कांदा पोहे रेसिपी आपल्या भेटीस घेऊन येत आहोत.
पोहे बनवण्यासाठी टिप्स:
- योग्य प्रमाणात तेलाचा वापर करावा.
- पोह्यात भाजलेले शेंगदाणे टाकू शकता.
- किसलेले नारळ किंवा शेव पोह्यावरून सर्व्ह करताना सजवू शकता.
- हमखास लिंबूची फोड सोबत देऊन सर्व्ह करू शकता.
लागणारे साहित्य:
- पोहे.
- दीड चमचे हळद.
- 4 मिरच्या.( बारीक तुकडे)
- चिमूटभर मोहरी.
- 2 बारीक चमचे तेल.
- 1 कांदा बारीक चिरून.
- कोथिंबीर बारीक करून.
- कढीपत्ता. ( हवा असल्यास )
- भाजलेले शेंगदाणे.
दुसरा पॅटर्न
कृती :
- पोहे पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. कोमट पाण्यात भिजत ठेवा. मऊ झाल्यानंतर एका भांड्यात नितळून घ्या.
- शेंगदाणे भाजून घ्या.
- आता गॅसवर कढईत तेल गरम करा. त्यात हळद, मोहरी, कांदा, मिरच्या परतून घ्या. नंतर शेंगदाणे, कढीपत्ता टाका.
- आता मऊ झालेले पोहे कढईत टाका. परतून घेतलेल्या मसाल्यासोबत चांगले एकजीव करा. शेवटी कोथिंबीर टाका.
- पोहे तयार झाल्यानंतर 2 3 मिनिटांनी ओल्या किसलेल्या खोबऱ्यासोबत किंवा शेव सोबत सर्व्ह करा. लिंबुची फोड देखील देऊ शकता.
मेथी पराठा रेसिपी
मेथी पराठा हा मेथीच्या भाजीची काही पाने, गव्हाचं पीठ, हिरव्या मिरच्या, दही इतक्या कमी सामग्रीमध्ये बनणारी सोपी पाककृती आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तसंच हेल्दी रेसिपीचा ऑप्शन शोधत असाल तर मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे. ब्रेकफास्ट शिवाय मेथीचा पराठा तुम्ही डब्यातही पॅक करून मुलांना किंवा घरातील इतर सदस्यांना देऊ शकता.
सामग्री
- 1 कप गव्हाचे पीठ
- 1 कप मेथीची पाने
- 3.4 कप दही
- 2 चमचे लसूूण पेस्ट
- 1 चमचे साखर
- 1 चमचे ओवा
- 1 चमचे तीळ
- 1 चमचे तूप
- 2 चमचे मिरची पावडर
- आवश्यकतेनुसार हळद
- आवश्यकतेनुसार मीठ
एका बाऊलमध्ये 1 वाटी गव्हाचं कणिक आणि 1 वाटी मेथीची पानं घेऊन व्यवस्थित मिक्स करा. या मिश्रणात 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, 3 चमचे लसणाची पेस्ट, चिमुटभर हळद, 1 चमचा लाल तिखट पावडर टाकून सर्व सामग्री चांगली मिक्स करुन घ्या. पीठात साखर, मीठ आणि अर्धा कप दही टाकून मिश्रण एकजीव करा. हा पीठाचा गोळा थोडंसं तेल घालून चांगला मळून घ्या. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्या. कणिकेला पराठ्यासारखा गोल आकार द्या. पीठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या आणि त्या प्रत्येक गोळ्याला पराठ्यासारखा गोल आकार द्या. पराठा दोन्ही बाजूंनी चांगला खुसखुशीत भाजून घ्या. तयार झाले आपले गरमा गरम, हे पराठे तुम्ही दही, सॉस किंवा हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता.
बेसन पराठा
बेसन पराठा ही एक सोपी रेसिपी आहे, जी अगदी कमीत-कमी सामग्रींच्या मदतीनं काही मिनिटांमध्ये तयार केली जाते. हा पराठा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहे. महत्त्वाचे म्हणजे या पराठ्याची रेसिपी खास आणि वेगळी आहे. बेसनाच्या पिठामध्ये सर्व सामग्री मिक्स करून सर्वप्रथम पराठ्याचे सारण तयार केले जाते. त्यानंतर मळलेल्या पिठामध्ये सारण भरून पराठे लाटले जातात.
सामग्री
- 1 कप गव्हाचे पीठ
- 1/2 कप बेसन
- 1/2 चमचे हळद
- 2 चमचे मिरची पावडर
- आवश्यकतेनुसार मीठ
- 1 चमचे वाळलेल्या मेथीची पाने
- 1/2 चमचे ओवा
- 1/2 चमचे जिरे
- आवश्यकतेनुसार हिंग
- 1/2 चमचे गरम मसाला पावडर
- 2 चमचे शेंगदाण्याचे तेल
कृती
एका बाउलमध्ये अर्धा कप बेसन घ्या. त्यात चिमूटभर हिंग, एक चमचा कसुरी मेथी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद घालून सर्व सामग्री मिक्स करून घ्यावी. या मिश्रणात चवीनुसार मीठ देखील टाका आणि सर्व सामग्री पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. आता बाउलमध्ये तेल घालून सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्या. मिश्रणाच्या गाठी तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. गव्हाचे पीठ मळून घ्याआता दुसरा बाउल घ्या. त्यामध्ये गव्हाचे पीठ आणि चवीनुसार मीठ एकत्र घ्यावे. आता पाणी टाकून पीठ मळून घ्या. पिठाचे लहान गोळे तयार करा आणि पोळ्या लाटून घ्या. लाटलेल्या पोळीवर तयार केलेलं बेसनचं सारण ठेवा आणि पिठाचा पुन्हा गोळा करून पराठा लाटून घ्या. यानंतर गॅसच्या मध्यम आचेवर तवा गरम करत ठेवा. तवा गरम झाल्यानंतर लाटलेले पराठे त्यावर शेकवा. तूप किंवा तेल लावून पराठा दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा.
व्हेजिटेबल सॅन्डविच
साहित्य:
- 2 ब्रेडचे स्लाईस
- काकडीचे पातळ काप 6-7
- टोमॅटोचे पातळ काप 5
- शिजलेल्या बटाट्याचे पातळ गोल काप 4-5
- कांद्याची पातळ चकती 1-2
- 1 टेस्पून बटर
- चिमूटभर काळे मिठ
हिरवी चटणी
- दिड कप कोथिंबीर
- 4-5 हिरव्या मिरच्या
- 1 टिस्पून जिरपूड
- किंचीत साखर
- चवीनुसार मिठ
कृती:
- सर्वात आधी हिरवी चटणी बनवून घ्यावी. दिड कप कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 टिस्पून जिरपूड, चवीनुसार मिठ, साखर आणि थोडे पाणी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून चटणी करावी.
- ब्रेडच्या कडा नको असतील तर काढून टाकाव्यात. दोन्ही ब्रेडच्या एका बाजूला आधी बटर आणि चटणी लावून घ्यावी.
- एका ब्रेडवर आधी काकडीचे काप पसरून लावावेत. त्यावर टोमॅटोचे काप ठेवावेत. त्यावर काळे मिठ भुरभुरावे. त्यावर बटाट्याच्या चकत्या लावाव्यात, किंचीत मिठ पेरावे आणि त्यावर कांद्याची चकती ठेवावी. बटर आणि चटणी लावलेला ब्रेडचा स्लाईस यावर ठेवावा.
- सुरीने तुकडे करावेत. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस