Breaking News
नवी मुंबई ः घरात कोणीही नसल्याची संधी साधत कोपरी गावात चोरट्यांनी घरफोडी करुन सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा सूमारे 2 लाखांचा ऐवज चोरुन नेला. या अट्टल चोराने सोन्याच्या बनावट दागिन्यांना हातही लावला नाही. तसेच डाळी आणि धान्यांचे डब्यातही दागिन्यांची शोधाशोध केली.
कोपरी गावात ठाकूर आळी येथे राहणारे देविदास भोईर यांचे कुटुंब 28 तारखेला त्यांच्या पत्नीच्या माहेरी उलवे येथे गेले. रात्री तेथेच सर्वांनी मुक्काम केला. 30 तारखेला दुपारी 3 च्या सुमारास घरी काम करणाऱ्या महिलेचा फोन आला व तिने घराचा कडी कोयंडा तोडला असून आतील सामान अस्ताव्यस्त पडले असल्याची माहिती दिली. हि माहिती मिळताच सर्वजण कोपरी येथे आले. तेव्हा चोरट्याने घरात चोरी केल्याचे समोर आले. घरातील वस्तूंची पाहणी केली असता दागिने व लॅपटॉप असा एकूण 2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या बाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात घरफोडीचा गुन्हा नोंद केला आहे.
दागदागिने धान्यात लपवून ठेवतात हि बाब चोरट्याला माहिती असल्याने त्याने केवळ कपाटच नाही तर डाळी आणि धान्यांचे डब्बेही रिकामे केले. विशेष म्हणजे घरातील कपाटात अनेक सोन्याप्रमाणे दिसणारी बनावट दागिणेही होते मात्र चोराने ती नेली नाहीत. त्यामुळे चोर अट्टल असून पाळत ठेऊन चोरी केल्याचा संशय आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai