Breaking News
दोन कार व 25 लाखाचा ऐवज हस्तगत
नवी मुंबई : निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची धाड पडल्याचे भासवून 34 लाख 85 हजाराचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन कार व लुटलेला 25 लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तीन वेगवेगळ्या टोळ्यांनी एकत्र येऊन स्पेशल 26 चित्रपटाप्रमाणे बनावट धाड टाकून हा गुन्हा केला होता.
ऐरोली सेक्टर 6 येथे राहणाऱ्या कांतीलाल यादव यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. ते सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. 21 जुलैला दुपारी त्यांच्या घरी अज्ञात सहाजण आले होते. त्यांनी ते लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी व कर्मचारी असल्याचे सांगून त्यांनी हि कायदेशीर धाड असल्याचे भासवले होते. यादरम्यान त्यांच्या टोळीचे काहीजण काही अंतरावरून भवतालच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. यादरम्यान घरात घुसलेल्या तोतया एसीबीच्या पथकाने यादव यांच्या घरातून तब्बल 34 लाख 75 हजाराचा ऐवज एकत्र करून लुटला होता. दरम्यान एसीबीची धाड असल्याचेच समजून यादव हे देखील दोन दिवस शांत होते. मात्र त्यानंतर त्यांना संशय आल्याने तिसऱ्या दिवशी त्यांनी रबाळे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यावरून गुन्हा दाखल होताच उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने परिसरातले सीसीटीव्ही तपासून संशयित कारची माहिती मिळवली होती. त्याद्वारे पुणे, कल्याण, मुंबई परिसरातून शिताफीने अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. दीपक कविटकर (47), नरेश मिश्रा (52), रुपेश नाईक (42), सिद्धेश नाईक (32), मुस्तफा करंकाळी (40), विजय बारात (43), देवेंद्र चाळके (32), किशोर जाधव (47), जुल्फिकार शेख (43), वसीम मुकादम (39) व आयुब खान (50) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अशा प्रकारे लुटमारीचा त्यांचा पहिलाच गुन्हा असून काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तीन वेगवेगळ्या टोळीच्या व्यक्तींना एकत्र करून यादव यांच्या घरावर धाड टाकून लुटीचा बनाव रचला होता. यादव यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची अपसंपदा असल्याची टीप काही व्यक्तींना मिळाली होती. यावरून त्यांनी स्पेशल 26 प्रमाणे छापा टाकून लुटीचा बनाव रचला होता. प्रत्यक्षात मात्र 34 लाख हाती लागल्याने त्यांचीही निराशा झाली होती. यादव यांच्या घरावर छापा टाकण्याची तीन महिन्यांपासून गुन्हेगारांची तयारी सुरु होती. एप्रिल मध्ये देखील त्यांनी छापा टाकण्याचा प्रयत्न केला असता काही कारणाने तो रद्द केला होता. त्यानंतर 21 जुलैला त्यांनी नियोजनाप्रमाणे छापा टाकला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai