बंद असलेली आपले सेवा केंद्र त्वरित कार्यान्वित करा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 18, 2023
- 410
कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे निर्देश
नवी मुंबई ः कोकण विभागातल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बंद असलेली आपले सरकार सेवा केंद्र तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करावे आणि इतर सर्व योजनांच्या प्रगतीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्ष रहावे. सर्व योजनांना शासनाकडून देण्यात आलेले आर्थिक व भौतिक लक्षांक साध्य करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या.
कोकण भवनातील पहिल्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाच्या बैठक कक्षात डॉ. कल्याणकर यांच्या अध्यक्षते खाली कोकण विभागातील जिल्हा परिषदांच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर उपस्थित होते. बैठकीत माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या थीममध्ये करावयाच्या कामांबाबत आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना, जल जिवन मिशन, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला व बाल विकास विभागाच्या योजना, ग्रामपंचायत विभागाकडील योजना, समाजकल्याण विभागाकडील योजना इ. योजनांचा आयुक्तांनी आढावा घेतला.
यावेळी सर्व जिल्हयांमार्फत आपल्या कार्यक्षेत्रात माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत माहे जुन व जुलै, 2023 दरम्यान केलेली कामे व माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2023 मध्ये करावयाच्या कामांबाबत सादरीकरण करण्यात आले. घरकुल योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमिन उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडया व शाळा यांना भेटी देऊन क्षेत्रिय कामकाजाचा आढावा घेण्याबाबत निर्देश यावेळी देण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai