Breaking News
कामगाराकडून व्यावसायिकाची फसवणूक
नवी मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाकडे मागील अडीच वर्षापासून कामाला असलेल्या एका तरुणाने आईच्या उपचाराच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून 4 लाख रुपये घेऊन त्याबदल्यात त्यांना 10 तोळे सोन्याच्याऐवजी बॅगेमधून पेपरचे रोल केलेले बंडल देऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. आलम सरफराज असे या तरुणाचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार अली व्यवसायिक अकबर मोहम्मद हुसेन काचवाला (62) यांचा मुंबईत फोटो फ्रेम बनविण्याचा व्यवसाय आहे. तीन वर्षापूर्वी काचवाला यांनी आलम सरफराज याला आपल्याकडे कामाला ठेवले होते. आलम याने काचवाला यांच्याकडे अडीच वर्षे काम केले. मात्र यादरम्यान त्याची कोणतीही माहिती काचवाला यांनी घेतली नाही. याचाच फायदा उचलत आलम याने गेल्या आठवड्यात काचवाला यांना संपर्क साधून त्याच्या आईची तब्येत ठिक नसल्याचे कारण सांगत तिच्या उपचारासाठी 4 लाख रुपयांची मागणी केली. काचवाला यांनी त्याला 4 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवून त्याबदल्यात तारण म्हणून काहीतरी ठेवण्यास सांगितले. यावर आलम याने त्याच्याकडे असलेले 10 तोळे वजनाचे सोने तारण म्हणून देण्याच्या बहाण्याने त्यांना सानपाडा येथे बोलावून घेतले. त्यानुसार शनिवारी दुपारी काचवाला 4 लाख रुपये घेऊन सानपाडा रेल्वे स्थानक येथे आले. आलम याने त्यांना रिक्षातून तुर्भे गाव सेक्टर-22 येथे नेले. आलम याने काचवाला यांना सोन्याचे दागिने असल्याचा बहाणा करुन एक बॅग दिली आणि काचवाला यांनी 4 लाख रुपयांची रोख रक्कम त्याला दिली. आलम याने पैसे ठेवून परत येण्याचा बहाणा करुन त्याठिकाणावरुन पैसे घेऊन पलायन केले. बराच वेळ झाल्यानंतर देखील आलम परत न आल्याने काचवाला यांनी आलमच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचा फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी आलमने दिलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यात पेपरचे रोल केलेले बंडल असल्याचे आढळून आले. आलमने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एपीएमसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai