Breaking News
नवी मुंबई : व्हायग्रा आणि इतर औषधे विक्रीच्या बहाण्याने परदेशातील नागरिकांकडून त्यांच्या कार्डची माहिती घेऊन त्याद्वारे त्यांना गंडा घालणाऱ्या नेरुळ आणि वाशीतील तीन कॉल सेंटरवर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. या कॉल सेंटरमधून कम्प्युटरची हार्ड डिस्क, मोबाइल फोन, लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी एकूण 36 जणांविरोधात नेरुळ आणि वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून, त्यांच्यावर कारवाईला सुरुवात केली आहे. या बोगस कॉल सेंटरचालकांनी परदेशातील अनेक लोकांना कोट्यवधींना गंडा घातला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या कॉल सेंटरमधील कर्मचारी ‘मेडिकल फार्मा' या अमेरिकी कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे व विदेशी नागरिक असल्याचे भासवून अमेरिका व इतर देशांमधील नागरिकांना व्हीओआयपी कॉल करून संपर्क साधत होते. त्यांनतर ते त्यांना व्हायग्रा, सीएलएस, लिवीट्रो व इतर औषधांची विक्री करण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून त्यांच्या कार्डांची माहिती घेऊन त्यांची फसवणूक करीत होते. नेरुळमधील सेंच्युरीयन मॉलमध्ये अशा प्रकारचे कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे, युनिट-3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग सोनवणे, सहायक निरीक्षक ईशान खरोटे, हर्षल कदम आदींच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री सेंच्युरियन मॉलमधील व्ही केअर सोल्युशन कॉलसेंटवर छापा टाकला होता.
या कॉल सेंटरमधून परदेशातील नागरिकांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचे आढळून आल्यानंतर गुन्हे शाखेने तेथून आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्या ठिकाणी अशाच प्रकारे अवैधरित्या दुसरेदेखील कॉलसेंटर चालत असल्याचे समजल्यानंतर गुन्हे शाखेने दुसऱ्या मजल्यावरील इसेम्बी कॉलसेंटरवर छापा टाकला असता, त्या ठिकाणीदेखील असाच प्रकार सुरू असल्याचे उघड झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने या कॉलसेंटरमधून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी येथून 14 हार्ड डिस्क, मोबाइल फोन, लॅपटॉप व इतर साहित्य जफ्त केले.
वाशी सेक्टर-30 ए मधील रियलटेक पार्क या इमारतीतही बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर व त्यांच्या पथकाने शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास रियलटेक पार्कमधील फस्टस्टेप सोल्युशन या कॉल सेंटरवर छापा मारला. यावेळी या कॉल सेंटरमधील तरुण हे सुडो नावाने परदेशातील नागरिकांना व्हिओआयपी कॉल करून त्यांनाही अशाच औषधांची विक्री करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे आढळून आले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने येथून 23 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai