Breaking News
तिघा पिता पुत्रांना अटक
नवी मुंबई : नेरुळ येथे डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका मदतनिसला चौघांनी गाडीतून खाली खेचून बांबूने बेदम मारहाण करुन चाकूचे सपासप वार केले. रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यावर चालकाच्या मानेत खुपसलेला चाकू तशाच अवस्थेत टाकून आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी तिघा पिता पुत्रांना अटक केली आहे. एका फेरीवाल्याने केलेली चोरी युवराजने उघडकीस आणल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली. त्यामुळे अनधिकृत फेरीवाऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
युवराज अंजमेंद्र सिह असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो रुग्णवाहिकेवर मदतनीस आणि वेळप्रसंगी चालकाचे काम करत होता. पदपथावर भुर्जीपाव, नारळपाणी तसेच इतर फेरीवाल्यांच्या गाड्या लागत असतात. त्याच परिसरात खासगी रुग्णवाहिकादेखील उभ्या केलेल्या असतात. स्पंदन कार्डिक रुग्णवाहिकेचा चालक युवराज सिंह (30) याने काही दिवसांपूर्वी तिथल्या फेरीवाल्यांच्या चोरीचे फोटो काढले होते. परिसरात भुर्जीपाव, वडापाव विकणाऱ्याने व मित्राने मनोज साबणे याच्या टेम्पोतून नारळ चोरले होते. याचे फोटो युवराज याने मोबाईलने काढून नारळ विक्रेता मनोज साबणे याला दाखवले होते. आपली चोरी उघड झाल्याच्या रागात भुर्जी विक्रेत्याने त्याची दोन मुले व इतर एकाच्या मदतीने युवराजवर हल्ला करुन हत्या केली.
युवराज याला रविवारी रात्री एकाने फोन करून भेटीसाठी बोलवले होते. त्यानुसार सहकारी ज्ञानेश्वर नाकाडे याच्या रुग्णवाहिकेतून युवराज हा डी.वाय.पाटील रुग्णालयाकडे चालला होता. त्यांची रुग्णवाहिका रुग्णालयाच्या परिसरात पोहोचताच दबा धरून बसलेल्या चौघांनी युवराज याच्यावर जीवघेणा हल्ला केला. तसेच रुग्णवाहिकेवरही त्यांनी हल्ला केला. ज्ञानेश्वर यांनी तशीच गाडी पुढे नेवून पळ काढला. युवराज त्याच्या पोटात, हातावर दिसेल तेथे वार केले त्यात त्याच्या मानेत चाकू खुपसला. तेथेच युवराज कोसळला. तो मयत झाल्याची खात्री पटताच चौघेही पळून गेले. घटनेबाबत चालक ज्ञानेश्वर यांनी रुग्णवाहिका मालक सिध्देश्वर चितळकर आणि नेरुळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवराज याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सोमवारी रात्री नेरुळ पोलिसांनी अमजद रियाज खान (45), समीर अमजद खान (24) व शोएब अमजद खान (22) यांना अटक केली आहे. ते मानखुर्दचे राहणारे असून नेरूळमध्ये भुर्जी पाव विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या चौथ्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेवरून नेरुळ परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai