Breaking News
7 गुन्ह्यांची उकल; वाशी पोलीसांची कामगिरी
नवी मुंबई : नवी मुंबईतून तासाभराच्या अंतराने कारच्या काचा फोडून दोन लॅपटॉप चोरी झाले होते. त्यातील एका लॅपटॉपमध्ये लॅपटॉप कुठे आहे हे लॅपटॉपचे लोकेशन बदलताच मोबाईलवर संदेश देणारी यंत्रणा असल्याने पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला आणि अवघ्या चोवीस तासांत चोरटे जेरबंद झाले. तसेच त्यांचे 7 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे.
सेनिथील दुरायरजन कुमार, मुर्ती रामासामी चिन्नाप्पन, शिवा विश्वनाथन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 10 तारखेला संध्याकाळी अमेय विचारे आणि अभिषेक वैखान यांनी त्यांची कार विज्ञान सोसायटी, सेक्टर 17, वाशी येथे पार्क केली होती. काही वेळाने अमेय हे आपले काम आटोपत कारमध्ये बसले त्यावेळी गाडीची काच फोडून लॅपटॉप चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. नेमके याच वेळेस या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर अभिषेक यांनाही हाच अनुभव आला होता. अभिषेक यांचा अन्य लॅपटॉप त्यांनी दुरुस्तीसाठी दिला होता. तो घेऊन आल्यावर गाडीतील लॅपटॉप कारची काच फोडून नेल्याचे समोर आले होते. दोघांनीही याबाबत वाशी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला होता. यात अमेय यांच्या लॅपटॉपमध्ये एक अशी स्वयंप्रणाली होती की लॅपटॉप कुठे असेल ते मोबाईल वरून शोधता येते वा लॅपटॉपचे लोकेशन बदलले तरी मोबाईलवर संदेश येत होता. याचा फायदा तपास करताना पोलिसांना झाला तसेच गुन्हा घडल्यावर घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासण्यात आले व आरोपीतांचे ओळख पटवण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील पोलीस ठाणेमधील अभिलेख तपासण्यात आला होता. आरोपी हे घटनास्थळी पायी चालताना दिसुन येत होते. तसेच चोरीस गेलेल्या फिर्यादी यांच्या लॅपटॉपचे लोकेशन बाबत फिर्यादी यांना वारंवार त्यांच्या आय फोनवर माहिती मिळत होतीच. अशातच 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचे लोकेशन मिळताच याबाबत माहिती स्थानिक पोलिसांना दिली. तसेच वाशी पोलिसांचे पथक ही रवाना झाले. सुदैवाने पथक जाईपर्यंत छ. शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या आतील भागातील लोकेशन दाखवले गेले. रेल्वे पोलीसांच्या मदतीने तीन संशयीत इसमांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता तीन लॅपटॉप आढळून आले. त्यात अमेय आणि अभिषेक यांचाही लॅपटॉप होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai