Breaking News
संस्थेच्या इस्टेट मॅनेजरवर गुन्हा दाखल
नवी मुंबई : एस.आय.ई.एस. संस्थेच्या सव्वा कोटी देणगीचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेच्याच इस्टेट मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेला रोख स्वरूपात येणाऱ्या देणग्या संस्थेच्या खात्यात जमा न करता कामगारांच्या खात्यात जमा करून तिचा अपहार केल्याचा आरोप संस्थेने केला आहे. मागील पाच वर्षात हा प्रकार झाला असून संस्थेकडून बँक खात्यांच्या तपासणीत तो उघड झाला आहे.
साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या नेरुळ येथील दोन संस्थांमध्ये हा प्रकार घडला आहे. या संस्थेच्या आर्धिक देखभालीची जबाबदारी असणाऱ्या संस्थेच्याच पदाधिकाऱ्याने 1 कोटी 22 लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार संस्थेने नेरुळ पोलिसांकडे केली आहे. संस्थेला येणारे डोनेशन, देणगी स्वीकारून ती संस्थेच्या बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी योगेश परमानंद यांच्यावर होती. मात्र मागील पाच वर्षात त्यांनी सव्वा कोटींची देणगी स्वरूपातील रोकड संस्थेत जमा न करता तिचा अपहार केल्याचा संस्थेचा आरोप आहे. हि रोकड त्यांनी संस्थेच्याच वाहनचालक, लिपिक, शिपाई यांच्या बँक खात्यात जमा केली. तर सदर कर्मचाऱ्यांकडून त्यांची सही असलेले कोरे धनादेश स्वतःकडे घेतले होते. संस्थेच्या वेगवेगळ्या कामासाठी लागणारा निधी भागवण्यासाठी हे धनादेश घेतले असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र गतवर्षी संस्थचे खजिनदार देवदास नायर यांना संशय आल्याने त्यांनी नेरूळमधील संस्थेची व कामगारांची बँक खाती तपासली. त्यामध्ये काही कामगारांनी योगेश यांच्या सांगण्यावरून संस्थेच्या देणगीची रोकड त्यांच्या खात्यात जमा केली असल्याचे सांगितले. त्यानुसार संस्थेने हा अपहार उघड करून लाटलेले सव्वा कोटी परत करण्याची समज योगेश यांना दिली होती. परंतु त्यांनी ती परत न केल्याने संस्थेने त्यांच्या विरोधात नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai