दिल्लीपासून गल्लीपर्यंत संताप
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 22, 2024
- 427
केजरीवाल यांच्या अटकेचे देशभर पडसाद
मुंबई ः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी (21 मार्च) रात्री उशिरा अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अटक केली. त्याचे तीव्र राजकीय, सामाजिक पडसाद देशात उमटू लागले आहेत. देशभरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही खेळी खेळली जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगात गेल्याने दिल्लीतील सरकार कसं चालवलं जाईल, हा प्रश्न उभा राहिला आहे. लोकसभा निवडणुकीची उलटी गणती सुरु असताना हा प्रकार घडल्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना एकूण दहा समन्स बजावले होते, मात्र तरीही ते एकदाही ईडीसमोर हजर झाले नाहीत. अशातच, आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. यावर गुरुवारी सुनावणी झाली. तथापि, केजरीवाल यांना कठोर कारवाईपासून कोणतेही संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर काही तासांतच अंमलबजावणी संचनालयाची (ईडी) टीम गुरुवारी (21 मार्च) संध्याकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली आणि त्यांना अटक केली. यावेळी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते. ‘आप' कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी केजरीवालांच्या निवासस्थानाच्या परिसरात कलम 144 लागू केला होता.
केजरीवाल यांच्या अटकेनंतर सर्वत्र आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांकडून देशभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. दिल्लीमध्ये अचानक झालेली कारवाई ही म्हणजे तानाशाही असून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
- आपले जीवन देशाला समर्पित आहे
ईडीने केजरीवाल यांना शुक्रवारी राऊज एव्हेन्यू न्यायालयात हजर केले. येथे ‘आपले जीवन देशाला समर्पित आहे,' असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांना अटक केल्यानंतर, आम आदमी पार्टीसह इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष भाजप आणि केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले असून केजरीवालांच्या अटकेला कडाडून विरोध करत आहेत. तसेच, जोवर केजरीवालांची सुटका होत नाही, तोवर हे अभियान सुरूच राहील, असे आपने म्हटले आहे. - केजरीवाल यांच्या जागी कोण?
केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, कॅबिनेट मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज या तीन नावांची चर्चा आहे. असं असलं तरी, दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून जवळपास 10 वर्षांची कारकीर्द, आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा असलेल्या केजरीवाल यांच्या जवळपास जाणारा नेता निवडणं आम आदमी पक्षासाठी अवघड असणार आहे. यातही भर म्हणजे, लोकसभा निवडणुकांची उलटी गिनती सुरु झाली असताना आम आदमी पक्षाला ही निवड करावी लागणार आहे.
- कायदा जे काही करायचे आहे ते करेल
केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अण्णा हजारे म्हणाले, “मला खूप वाईट वाटतं की, माझ्यासोबत काम करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी दारूविरोधात आवाज उठवला होता. आता ते स्वतः दारू धोरण बनवत आहेत. मुख्यमंत्री बनल्यानंतर मद्य धोरणाबाबत मी त्यांना दोन वेळा पत्र लिहिले होते. पण त्यांनी माझं ऐकलं नाही आणि आता त्यांना अटक झाली. आता मी त्यांना कोणताही सल्ला देणार नाही, कायदा आणि सरकारला जे काही करायचे आहे ते करेल. - महाराष्ट्राभरात आपचे कार्यकर्ते आक्रमक
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर आम आदमी पार्टीकडून देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. या अटकेचे महाराष्ट्रातही पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्ये मेहेर सिग्नल परिसरात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी टायर जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. कोल्हापूरमध्येही आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आपचे कार्यकर्ते थेट भाजपच्या कार्यालयाकडे कुच करत होते. मात्र यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली. कोल्हापुरातील महावीर कॉलेज चौकातून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हे बीजेपी कार्यालयावर आंदोलनासाठी निघाले होते. त्यांना कोल्हापूर पोलिसांनी बळाचा वापर करत रोखले आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी आंदोलकांना रोखत अक्षरशः जबरदस्तीने उचलून गाडीत टाकले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आपच्या कार्यकर्त्यांनी केली. - राजकीय पडसाद
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे म्हटले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव तसेच अन्य नेत्यांनी या कारवाईवर टीका केली आहे. विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सूडबुद्धीने वापर करण्यात येत असल्याचे सांगत खासदार शरद पवार यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.
- सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका अचानक मागे घेतली आहे. आम्हाला जे काही सांगायचं आहे ते आम्ही कनिष्ठ न्यायालयात सांगू, असं आपने सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने याचिका मागे घेण्याची परवानगीही दिली आहे. यापूर्वी ईडीनेही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करत केजरीवाल यांच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी ईडीची बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती केली होती. - शुक्रवारी त्यांना दिल्ली हायकोर्टात सादर करण्यात आलं. त्यांच्या बाजून कपिल सिब्बल यांनी बाजू लढवली. तर, ईडीने त्यांच्या 10 दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, दिल्ली कोर्टाने त्यांना सहा दिवसांची कोठडी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai