Breaking News
नवी मुंबई : चोर हाती लागल्यावर अनेकदा त्याला बेदम मारहाण केली जाते. मात्र असे करणे कायद्याचे उल्लंघन आहे. अशाच प्रकारे संशयित चोराला मारहाण करणारे दुकान मालक आणि त्याच्या नोकरांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयित चोराने दिलेल्या तक्रारीवरून मालक व अन्य त्याच्या नोकराच्या विरोधात आणि चोरी केल्या प्रकरणी दुकान मालकाने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एपीएमसीमध्ये दुकान मालक रोनक भानुशाली यांचा इलायची सह अन्य पदार्थांचा ठोक व्यवसाय आहे. त्यांच्या कडे संजय चौधरी, लालाजी पगी , वीरेंद्रकुमार गौतम, राकेश पटेल हे काम करतात तर योगेश भानुशाली आणि करण भानुशाली हे नातेवाईक व्यवसायात मदत करतात. 27 तारखेला दुकानात इलायचीचे प्रत्येकी एक किलो वजनाचे 23 पुडे ज्याचे मूल्य 51 हजार 520 आहे ते आढळून आले नाही. हे पुडे राकेश पटेल याने चोरी केल्याचा संशय दुकानातील कामगार आणि मालक भानुशाली यांना आला. त्यामुळे सर्वांनी मिळून पटेल याला काठीने हाताने बेदम मारहाण केली. तो जखमी असतानाही दुकानात रात्रीभर डांबून ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास त्याला घेऊन सर्व एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी त्याची हालत पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी पटेल याला उपचारार्थ वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केले. चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याप्रकरणी पटेल याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करीत दुकान मालक व इतर कामगारांना तात्काळ अटक करण्यात आली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने फर्मावली आहे. तर दुसरीकडे चोरी केल्या प्रकरणी रोनक भानुशाली यांनी दिलेल्या तक्रारी वरून राकेश पटेल यांच्या विरोधात चोरी केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितले कि चोरी करणे गुन्हा असला तरी एखादा संशयित आरोपी सापडला तर त्याला मारहाण करणे, डांबून ठेवणे, हे कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे दोन्ही कडून दिलेल्या तक्रारी वरून तसेच परिस्थिती पाहून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai