Breaking News
1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर 7 मे रोजी सुनावणी पार पडली. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. या अटकेपुर्वी प्रवर्तन निर्देशनालयाने केजरीवाल यांना हजर राहण्यासंदर्भात 10 समन्स पाठवले होते. त्यांनी प्रत्येकवेळी प्रशासकीय कारण देत हजर राहण्यास टाळले. परंतु, अखेर या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी त्यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर केजरीवाल यांच्या कार्यालयावर व घरावर ईडी ने छापे मारले होते. या छाप्यात त्यांना काय मिळाले हे गुलदस्त्यात आहे.
ही अटक बेकायदेशीर असल्याने त्याला केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. केंद्रिय निवडणुक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यानंतर आपल्याला अटक करण्यात आल्याचे सांगत प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न केंद्र सरकाचा असल्याचा आरोप त्यांनी सरकार व ईडीवर केला होता. याच मुद्द्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. केजरीवाल यांच्या मागणीला ईडीच्यावतीने अतिरिक्त सॉलीसिटर जनरल राजू व केंद्र सरकारच्यावतीने सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांनी तीव्र विरोध केला.
शुक्रवारी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने यासंदर्भात निकाल दिला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच 2 जून रोजी अरविंद केजरीवाल यांनी ईडीकडे आत्मसमर्पण करावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. यावेळी अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यास चुकीचा पायंडा पाडला जाईल, त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी जामीन देऊ नये, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना सर्वोच्च दिलासा देत जामिन मंजुर केल्याने त्यांना निवडणुकीच्या प्रचारात भाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai