Breaking News
उरण : घरी पोहचविण्यासाठी मोठ्या विश्वासाने ओळखीच्या मित्राकडे सोपविलेल्या दहा वर्षीय निष्पाप हर्ष बिंदू यादव याचे अपहरण करून मित्रांनेच जुन्या भांडणाचा राग धरून गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह खोपटा खाडीत टाकून पलायनाच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या उरण पोलिसांनी दिड तासातच मुसक्या आवळल्या आहेत.
उरण तालुक्यातील चिर्ले गावात बिंदू राम अजोर (33) हे गृहस्थ पत्नी आणि एकुलत्या एक असलेल्या दहा वर्षाच्या हर्षसह मढवी यांच्या चाळीत भाड्याने राहत आहेत. पत्नी गावी गेल्यावर मुलगा आणि वडील घरी एकटेच होते. मुलगा एकटाच राहात असल्याने काळजी वाटत असल्याने बिंदू यांनी मंगळवारी मुलाला सोबतच घेऊन कामावर निघाले होते. मात्र वाहनातून मालाची डिलिव्हरी करण्यासाठी कंपनीत लहान मुलाला प्रवेश देण्यास सुरक्षा रक्षकांनी नकार दिला. यामुळे मुलाला कुठे ठेवायचे या विवंचनेत असतानाच त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपी कांताराम सिताराम यादव त्याठिकाणी आलेला दिसला. कंपनीत माल उतरविण्यात उशीर होणार असल्याने बिंदू यांनी हर्ष याला घरी घेऊन जाण्यासाठी कांताराम यादव याच्याकडे स्वाधीन केले. हर्ष घरी पोहचला की नाही याची माहिती घेण्यासाठी बिंदु यांनी संपर्क साधला मात्र आरोपींकडून काही प्रतिसाद मिळाला नसल्याने बिंदू राम यांनी रात्री घर गाठले. मात्र घरी ना मुलगा सापडला ना कांताराम. यामुळे बिंदू राम यांनी कांताराम व मुलाचा रात्रभर परिसरात शोध घेतला. मात्र दोघांचाही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान सकाळी खोपटा -पोगोटे रिलायन्स या कोस्टल रोड वरील खाडीत येथील सुरक्षा रक्षकाला मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी वेळ न दवडता तत्काळ उरण पोलिसांना खबर दिली. खबर मिळताच उरण पोलीस पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. खाडीत धारदार शस्त्राने हर्ष याचा गळा चिरून हत्या करून टाकलेले मृतदेह आढळला. एव्हाना वडिल पोलिस ठाण्यात फिर्यादीसाठी पोहचले होते. तांत्रिक मदतीने पोलिसांनीही शिताफीने संशयित आरोपी कांतारामला पलायनाच्या तयारीत असतानाच ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच जुन्या भांडणाचा राग धरून हर्षची हत्या केली असल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. मित्रांनेच मित्राच्या मुलांची गळा चिरून हत्येच्या दुदैवी प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai