टपर्‍यांचे गौडबंगाल होणार उघड

पालिका करणार टपर्‍यांची पडताळणी 

पनवेल ः पदपथ, मोकळे भूखंड, रस्त्यावर बसणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई होत असल्याने विविध बोगस संस्था, संघटनाच्या नावाखाली बेकायदा टपर्‍या उभारल्या जात आहेत. या टपर्‍यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. 400 हून अधिक टपर्‍यांवर रंगवलेली नोटीस चिकटविण्यात आली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे बोगस संस्था, संघटनांची धावपळ सुरू झाली आहे.

पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर शहरात बेकायदा व्यावसायिकांवर चाप बसला. पदपथ, मोकळ्या जागा, रेल्वे स्थानक आदी परिसरांत कारवाईसाठी महापालिकेची चार अतिक्रमणविरोधी पथके कार्यरत असल्यामुळे बेकायदा व्यावसायिकांवर आळा बसला. महापालिकेच्या कारवाईमधून वाचण्यासाठी आरे सरिता दूध योजना, दिव्यांग स्टॉल, चर्मकार संघटना आदीचा आधार घेऊन पदपथावर टपर्‍या थाटल्या आहेत. खोपोली येथील आरे दूध योजनेच्या टपर्‍या तर योजना बंद झाली असतानाही थाटण्यात आल्या. महापालिकेच्या कारवाईतून वाचण्यासाठी अनेकांनी हा मार्ग अवलंबिला. या टपर्‍यांची चौकशी करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. व्यावसायिकांना देण्यात आलेल्या परवानगीची कागदपत्रे महापालिकेकडे सादर करावीत, असे आवाहन उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने या बेकायदा टपर्‍यांवर कागदी नोटीस न चिकटविता थेट रंगवलेली नोटीस लावण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिकांकडून आम्हाला नोटीस मिळाली नाही, असा दावा वेळोवेळी केला जातो. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. म्हणून महापालिकेने ही आगळीवेगळी शक्कल लढविली आहे. महापालिका अधिनियमाचे कायदे थेट व्यावसायिकांच्या टपरीवर रंगविले जातात आणि त्याचे छायाचित्र काढले जात आहे. आतापर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रातील 400 हून अधिक टपर्‍यांवर नोटीस लावण्यात आली आहे. नोटीस लागल्यानंतर संबंधित मालकाने टपरी अधिकृत असल्याचे पुरावे सादर केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. टपर्‍यांवर नोटीस लावण्यास सुरुवात केल्यानंतर बेकायदा दिव्यांग स्टॉल, चर्मकार स्टॉलधारकांचे धाबे दणाणले असून, टपर्‍या लपविण्यासाठी धावपळ सुरू आहे.

महापालिका क्षेत्रात अनेक बेकायदा टपर्‍या विविध संस्था संघटनांच्या नावाखाली सुरू आहेत. महापालिकेच्या कारवाईत अडथळा आणला जातो. त्यामुळे यांची चौकशी करण्यासाठी महापालिकेने कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. कारवाईतून अनेक बेकायदा टपर्‍यांचे गौडबंगाल समोर येणार आहे.

- जमीर लेंगरेकर, उपायुक्त