Breaking News
नवी मुंबई : अडवली भुतवली येथील पारधी वस्तीमध्ये एकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्याच्यावर रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीने गाई चोरल्याचा संशयातून त्याला मारहाण केल्याचे तिघांनी मान्य केले आहे.
रबाळे एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत मंगळवारी हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी राहणाऱ्या ठाकूर (45) नावाच्या व्यक्तीचा मृतदेह राहत्या घरात मिळून आला होता. याची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. पाहणीमध्ये या व्यक्तीच्या शरीरावर जखमा दिसून आल्या होत्या. त्यावरून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिघांनी त्यांना रिक्षात कोंबून अपहरण करून नेले होते असे समोर आले. त्यानंतर काही वेळानी पुन्हा त्यांनीच मृत अवस्थेतील ठाकूर यांना राहत्या घरात टाकून पळ काढला होता. त्याद्वारे पोलिसांनी शिरवणे एमआयडीसी परिसरातील दोन तबेले चालक व एक रिक्षाचालक अशा तिघांना अटक केली आहे. उमाकांत गौड (51), जयप्रकाश गौड (25) व नागेश इंगळे (19) अशी त्यांची नावे आहेत. उमाकांत याच्या तबेल्यातून काही महिन्यांपूर्वी तीन गाई चोरीला गेल्या होत्या. या गाई अडवली भुतवली येथील पारधी वस्तीत राहणाऱ्या ठाकूर याने चोरल्याचा त्यांना संशय होता. यातून त्यांनी त्याच्या अपहरणाचा कट रचून रिक्षातून निर्मनुष्य ठिकाणी नेले. त्याठिकाणी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पुन्हा त्यांच्या घरात टाकून पळ काढला होता. त्यानुसार तिघांनाही अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले. ठाकूर हे त्याठिकाणी एकटेच रहायला होते. परिसरातील तबेल्यांमध्ये मिळेल ते काम करून उपजीविका भागवायचे. मात्र त्यांची पूर्ण ओळख पटेल असा कोणताही कागदोपत्री पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai