Breaking News
नवी मुंबई : एका नावाजलेल्या कंपनीची जाहिरात विविध व्हॉटसॲप समूहात करण्याचे टास्क देऊन 18 लाख 51 हजार 783 रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी हे 70 वर्षीय जेष्ठ नागरिक असून घणसोली येथे राहतात.
घणसोली येथे राहणाऱ्या एका निवृत्त 70 वर्षीय जेष्ठ नागरिकांच्या मुलीस एका अज्ञात क्रमांकावरून व्हीआयपी 4 ऍमेझॉन ग्लोबल रिक्रुटमेंट इंडिया या समूहात समाविष्ट केले. सदर समूहाचे प्रशासक माईक व समूहातील सर्वांनी संगनमत करीत एक पेड टास्क फिर्यादीच्या मुलीस दिले. तसेच 5000 व्हीआयपी टास्क 2215 या टेलिग्राम समूहात सहभागी होण्यास सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादी यांच्या मुलीने टेलिग्राम समूहात प्रवेश केला.
या ठिकाणी ऍमेझॉन कंपनीचे उत्पादनाची जाहिरात करून पैसे कमविण्याचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला पैसेही देण्यात आले. मात्र अधिक पैसे असतील तर अनामत रक्कम जमा केल्यास अधिक पैसे कमावू शकता असे आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी विविध बँक खाते क्रमांक देण्यात आले. घरबसल्या जाहिरात करून पैसे कमवावे या उद्देशाने फिर्यादी यांच्या खात्यातून पैसे भरले जाऊ लागले. मात्र वेळोवेळी अधिक पैशांचे आमिष दाखवून पैशांची मागणी होत राहिली. 29 मे ते 6 जून दरम्यान तब्बल 18 लाख 51 हजार 783 रुपये फिर्यादी यांनी आरोपीच्या विविध खात्यात जमा केले आणि दिलेले टास्क सुद्धा पूर्ण केले मात्र त्याचे पैसेच मिळत नसल्याने आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात तक्रार दाखल केली त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सायबर गुन्हे कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अशा पद्धतीने फसवणूक करणारे नामवंत कंपनीच्या नावाचा वापर करतात मात्र प्रत्यक्षात फसवणूक करणाऱ्यांचा आणि संबंधित नामांकित कंपनीचा कुठलाही संबंध नसल्याचे अनेकदा समोर आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai