Breaking News
नवी मुंबई ः बांग्लादेशमधून भारतात रिलस्टार बनण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला मावशीनेच वेश्याव्यवसायात ढकलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून सर्वजण गोवा परिसरात राहणारे आहेत. ऑनलाईन ग्राहक मिळवून ते सीबीडीला आले असता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने त्यांच्यावर कारवाई केली.
एक महिला अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी ऑनलाईन ग्राहक शोधत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी उपनिरीक्षक स्नेहल आढे यांचे पथक केले होते. या पथकाने बनावट ग्राहक तयार करून महिलेला संपर्क साधला होता. त्यामध्ये शनिवारी दुपारी बेलापूर येथे भेटीचे ठिकाण ठरले होते. यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. यावेळी अल्पवयीन मुलीसह दोन महिला त्याठिकाणी आल्या असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत त्या गोव्याच्या राहणाऱ्या असून मूळच्या बांग्लादेशी असल्याचे समोर आले. तसेच सर्वजण भारतात घुसखोरी करून आल्या असल्याचेही उघड झाले. तर अल्पवयीन मुलीकडे अधिक चौकशी केली असता ती रील स्टार बनण्यासाठी भारतात आली होती असे तिने सांगितले. भारतात मोठ्या प्रमाणात रील पाहिल्या व पसंद केल्या जात असल्याने ती मावशीसोबत आली होती. तिच्या आईचे बांग्लादेश मध्येच दुसरे लग्न झाले असून तेव्हापासून मावशी तिचा सांभाळ करत आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीला भारतात आणल्यानंतर मावशीने इतर एका बांग्लादेशी महिलेसोबत मिळून तिला वेश्याव्यवसायात ढकलले. त्यासाठी त्या ऑनलाईन ग्राहक शोधायच्या. तर तिला घेऊन त्या इतर राज्यातही ग्राहकांच्या शोधात गेल्याचे समोर येत आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलीची सुटका करून दोन्ही महिलांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai