Breaking News
सात आरोपी जेरबंद; नवी मुंबई गुन्हे शाखेची कामगिरी
नवी मुंबई : स्वस्तात सोने देतो म्हणून आमिष दाखवून आरोपींनी फिर्यादींना बोलावले होते. मात्र ठरलेल्या ठिकाणी जाऊन फिर्यादी यांचे अपहरण करून 13 लाखांची रोकड घेऊन आरोपी फरार झाले. तांत्रिक तपास करुन नवी मुंबई गुन्हे शाखेने रोकड लंपास करुन अपहरण करणाऱ्या 7 आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 12 लाख जप्त केले आहेत.
राज उर्फ मोहमंद आसिफ मोहमंद गालिब शेख, विशाल बाजीराव तुपे, रोहीत राजाराम शेलार, निलेश बाळू बनगे, शिवाजी मारूती चिकणे, विशाल गणपत चोरगे आणि दिलेर साजिद खान असे अटक आरोपींची नावे आहेत. यातील फिर्यादी आणि आरोपी राज यांची समाजमाध्यमाद्वारे जुजबी ओळख होती. त्या ओळखीतून आरोपीने फिर्यादी याला स्वस्तात सोने देतो म्हणून आमिष दाखवले. त्यातून सुमारे 30 लाख रुपयांचे सोने 13 लाख रुपयांत देतो असे आमिष दाखवले. ते घेण्याची तयारी फिर्यादी याने दर्शिवली त्यानंतर 26 जून रोजी सेक्टर 8 खारघर येथील स्व. भरतशेठ ठाकूर वाचनालयसमोर भेटून व्यवहार पूर्ण करण्याचे ठरले. त्यानुसार फिर्यादी हे रोकड घेऊन सदर ठिकाणी जाऊन आरोपीची वाट पाहू लागले. काही वेळात त्या ठिकाणी आरोपी आले आणि त्यांनी फिर्यादीला स्वतः पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांचे अपहरण केले. पुढे काही अंतरावर फिर्यादी यांच्याकडील 13 लाखांची रोकड घेऊन पोबारा केला.
याबाबत फिर्यादी यांनी खारघर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली असता आरोपी जेव्हा फिर्यादीचे अपहरण करीत होते. त्याचवेळी आरोपींच्या गाडीमागे दोन दुचाकीवर चार जण आढळून आले. त्यामुळे गुन्हा करणारे सात आठ जण असावेत असा अंदाज पोलिसांना आला, तसेच एका दुचाकीचा क्रमांक मिळवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर तांत्रिक तपास सुरु केला असता आरोपी डोंबिवली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तीन पथक पाठवून आरोपींना कल्याण नवी मुंबई आणि डोंबिवली या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून आरोपींना अटक केली. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून या चोरी प्रकरणातील 12 लाख 27 हजार 300 रोकड हस्तगत करण्यात यश आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai