Breaking News
उरण : उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांड मुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे. यातील आरोपी दाऊद शेखला मंगळवारी कर्नाटकमधून अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला आहे. यशश्री शिंदेने लग्नाला नकार दिला म्हणून तिची हत्या केल्याचं दाऊद शेखने सांगितलं आहे. अत्यंत क्रुरपणे हत्या करणाऱ्या दाऊद सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
25 जुलैला यशश्री शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर 26 जुलैच्या रात्री या मुलीचं प्रेत आम्हाला सापडलं. त्यानंतर शनिवार सकाळी म्हणजेच 27 जुलैला खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केला. या प्रकरणात आम्ही दोन ते तीन संशयित शोधले होते. त्यांच्या शोधासाठी आम्ही नवी मुंबई आणि कर्नाटक या ठिकाणी शोध पथक पाठवलं. ज्या गोष्टी आम्हाला कळत होत्या त्या कर्नाटकमध्ये आम्ही पथकाला देत होतो. त्यानंतर दाऊद शेखला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.
दाऊद शेख हा अनेक दिवस उरणला वास्तव्य करत होता. त्याच्यावर पॉक्सो प्रकरणात आरोप झाले आणि त्याला तुरुंगात जावं लागलं ज्यानंतर त्याने उरण सोडलं. करोना काळाच्या दरम्यान दाऊद शेख कर्नाटकमध्ये वास्तव्य करत होता आणि तिथे तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याने एक दोन कंपन्यांमधली नोकरी बदलली होती. या दरम्यान यशश्री शिंदेच्या तो संपर्कात होतो. समोर आलेल्या माहितीनुसार दाऊद शेख आणि यशश्री शिंदे यांचे प्रेमसंबंध होते. यशश्री शाळेत असल्यापासून दाऊदला ओळखत होती. दाऊद शेखने यशश्रीला लग्नाची मागणी घातली होती. तसंच लग्न करुन बंगळुरुला चल असंही तो तिला सांगत होता. मात्र यशश्रीने नकार दिला. 25 जुलैला तो यशश्रीला भेटायला आला होता. दोघांमध्ये भांडण झालं त्या भांडणातून दाऊदने तिची हत्या केली अशी माहिती आता समोर आली आहे. दाऊद शेखला अटक करण्यात आल्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास दाऊद शेखला अटक करण्यात आली. दाऊद शेखने गुन्हा कबूल केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai