Breaking News
पनवेल : शहरातील माणेक नगर सोसायटीत एका महिलेची तीन दिवसांपूर्वी (13 सप्टेंबर) हत्या झाली होती. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर एक नाव समोर आले. ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. कारण चक्क मुलीनेच आईची हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी प्रिया नाईक यांची मुलगी प्रणाली नाईक (26) हिला अटक करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
प्रिया नाईक (44) या पनवेल शहरातील माणेक नगर सोसायटीत राहात होत्या. 13 सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यांच्या नाकातोंडातून रक्त येत होते शिवाय गळ्यावर व्रण होते. त्यांना तातडीने पनवेलमधील सहस्रबुद्धे रुग्णालयात नेण्यात आले. तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
पनवेल शहर पोलिसांना हा संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटत होता. म्हणून त्यांनी आय-बाईक, अंगुली मुद्रातज्ज्ञ, श्वानपथक, न्यायवैद्यकीय सहाय्यक पथक यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करून घेतली. प्रिया नाईक यांची दोरी किंवा वायरसदृश्य वस्तूने गळा आवळून हत्या केल्याचा पोलिसांचा संशय होता. याप्रकरणी रविवारी (15 सप्टेंबर) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करत असताना पोलिसांना काही माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी विवेक गणेश पाटील (19) आणि विशाल अमरेश पांडे (19) यांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर प्रिया नाईक यांच्या हत्येत त्याची मुलगी प्रणाली नाईक हिचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी प्रिया नाईक यांच्या मुलीलाही अटक करून तिची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, घरगुती वादातून मुलीने आईच्या हत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai