Breaking News
8 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील हार्डीलिया केमिकल्स प्रा.लि. या कंपनीतील युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी युनियनच्या सदस्यांची कोणत्याही प्रकारची वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली नसतांना ती 5 एप्रिल रोजी झाल्याचे भासवून, तशा प्रकारची खोटी कागदपत्रे तयार करुन यूनियनच्या फंडातील 10 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आली आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी कामगारांच्या तक्रारी वरुन या प्रकरणातील युनियनच्या 8 पदाधिकाऱ्यांविरोधात अपहार तसेच बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
तुर्भे एमआयडीसीतील सुप्रसिद्ध हार्डीलिया केमिकल्स प्रा.लि. या कंपनीचे नाव काही वर्षापुर्वी एस.आय.ग्रुप इंडिया प्रा.लि. असे झाले होते. त्यानंतर त्याच कंपनीचे 2022 मध्ये ग्रॅमरसी ट्रेड इंइडस्ट्रीज प्रा.लि. या नावात रुपांतर झाले होते. या कंपनीत पूर्वीपासून हार्डीलिया केमिकल्स एम्प्लॉईज युनियन कार्यरत होती. फेब्रुवारी 2023 मध्ये ग्रॅमरसी ट्रेड इंडस्ट्रीज प्रा.लि.ने कंपनीतील कामगारांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) लागू केल्याने कामगारांनी हि योजना स्वीकारली. त्यामुळे मार्च 2023 पासून कामगारांनी कंपनीत जाणे बंद केले.
कंपनीने 5 एप्रिल 2023 रोजी नेरुळ मधील सेंच्युरियन बॅन्व्केट हॉलमध्ये कामगारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कपंनीचे व्यवस्थापन पदाधिकारी, युनियन सदस्य व युनियन पदाधिकारी हजर होते. त्यावेळी हजर असलेल्या कामगारांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. सदरचा कार्यक्रम हा फक्त कंपनीच्या कामगारांसाठी ठेवण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचा युनियनशी काहीही संबध नसताना युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे हार्डीलिया केमिकल्स एम्प्लॉइज युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्याचे भासवले. तसेच युनियन सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा त्याठिकाणी झाल्याची खोटी कागदपत्रे तयार केली. तसेच युनियन मधील सदस्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता विशेष सर्वसाधारण सभेच्या ठरावामध्ये अनुमोदक, सुचक यांची नावे त्यांना न विचारता परस्पर टाकून, बेकायदेशिररीत्या कागदोपत्री ठराव पास झाल्याचे दाखवण्यात आले. त्याचप्रमाणे युनियन मधील सदस्यांचे कोणतेही बहूमत न घेता, तसेच एकमताने ठराव न घेता, यूनियनच्या फंडातील 10 लाख रुपये युनियनच्या अध्यक्षांना चेकव्दारे दिल्याचे आढळून आले.
विशेष म्हणजे कामगार उपायुक्त, ठाणे यांनी हार्डीलिया केमीकल्स एम्फ्लॉइज युनियन रदद किंवा कॅन्सल केलेली नसतांना युनियनमधील पदाधिकाऱ्यांनी युनियनच्या घटनेची अंमलबजावणी न करता, युनियनच्या फंडाचा अपहार केल्याचे कंपनीतील कामगारांना लक्षात आल्यानंतर या कामगारांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai