विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2024
- 519
सिडको आणि पालिकेच्या प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकाप्रण व भुमीपुजन
नवी मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत सिडको आणि पालिकेने उभारलेल्या अनेक विकासकामांच्या उद्घाटनांचा, भुमीपूजनांचा कार्यक्रम पार पडला. सिडको प्रदर्शन केंद्र येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांच्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात विविध नागरी सुविधा, प्रकल्प यांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सिडकोच्या माध्यमातून वाशी येथील महाराष्ट्र भवनचे भूमिपूजन, नैना नगर रचना परियोजनांतर्गत विकासकामे, ठाणे पुनरुत्थान योजना, 26 हजार 675 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनाचा प्रारंभ, आंतरराष्ट्रीय खारघर व्हॅली गोल्फ कोर्स, सेंट्रल एक्सलन्स येथील प्रेक्षक गॅलरी, ईर्शाळवाडीतील नागरिकांना घराच्या चाव्यांचे वाटपासह नवी मुंबई महापालिका रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरेपी सुविधेचा प्रारंभ, पाणीपुरवठा, पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, विविध पायाभूत सुविधांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटनही यावेळी करण्यात आले. तसेच नवी मुंबईच्या विकासाला गती देणारे चांगले काम नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून होत असून 25 नागरी सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे याबद्दल समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये ऑलिंपिक आकाराचा तरणतलाव, महिलांसाठी कॅन्सर तपासणी सुविधा, 10 बेडचा केमोथेरपी वॉर्ड, शाळा, मार्केट, आरोग्य केंद्र, जलकुंभ, ई-बसेस, ई-चार्जिंग अशा 410 कोटीहून अधिक रक्कमेच्या विविध प्रकारच्या सुविधांचा समावेश असल्याचे सांगितले. पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते, आता महानगरपालिका कापडावर पुनर्प्रक्रिया करणार आहे, अशा वेगळया प्रकारच्या आधुनिक प्रकल्पाचा लोकांना फायदा होईल असेही ते म्हणाले.
याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी माझी लाडकी बहीण योजनेत नवी मुंबईतील 1 लाख 45 हजारहून अधिक महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळाला असून नवी मुंबईत चांगले काम झाल्याचा अभिप्राय दिला. यावेळी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अंतर्गत परिसर सखी वस्ती संघामधील 10 महिला वाहन चालकांना इलेक्ट्रिक वाहनाची चावी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या एनएमएमटी बसेसमधून महिलांना तिकीट दरात 50% म्हणजे हाफ तिकीटात प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी करताच कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित महिलांनी टाळयांचा गजर केला. नवी मुंबई पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना मागील वर्षी दिवाळीला 30 हजार सानुग्रह अनुदान मिळाले होते यावर्षी त्यामध्ये 3 हजाराची भरीव वाढ करीत 33 हजार सानुग्रह अनुदान देण्यात येईल असेही मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले.
- महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता
सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर प्रकल्पांद्वारे मुंबई महानगर प्रदेशाचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास घडवून आणण्याची व महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ईर्शाळवाडी दरडग्रस्तांकरिता कमी कालावधीत घरे बांधून सिडकोने मानवता जपली असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पातील दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ईर्शाळवाडी दरडग्रस्तांपैकी सिडकोमध्ये कंत्राटी स्वरूपावर नियुक्ती देण्यात आलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली. - महाविकास आघाडी सरकारवर टिका
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीच्या सरकारच्या कामाचा जोरदार आढावा यावेळी घेतला. आधीच्या सरकारने वर्षानवर्ष काम केले आणि महायुतीच्या 2.5 वर्षातील कामाची तुलना करुन कामाचे दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाऊदे असे त्यांनी उपस्थितांनी सांगितले. हे सरकार म्हणजे दैना बँक आहे. ज्यांनी सरकारच्या विविध योजनेत खोडा घातला त्यांना आता जोडा दाखवा असेही ते म्हणाले. जनतेच्या जिवनात बदल घडवण्यासाठी आम्ही काम करणार. लाडक्या बहिनींनी ताकद वाढवली तरी आम्ही 3 हजार देणार. तुम्ही कोविड मधल्या खिचडीत, डेडबॉडीच्या बॅगमध्ये, कोविड सेंटरमध्ये, चारा घोटाळ्यात, शेण घोटाळ्यात, कोळशात पैसे खाल्ले त्यामुळे तुम्हाला भ्रष्ट्राचारावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला केला. पुर्वीचे सरकार हफ्ते घेणारे आहे हे सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात हफ्ते भरणारे आहे.
- महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन
महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई येथे पार पडले. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प हा आमच्या स्वप्नातील प्रकल्प होता. जेवढी अर्थव्यवस्था वेगवान, डिजीटायझेशन होते. त्यासोबतच या क्षेत्रातील आव्हाने तितक्याच प्रमाणात वाढत जातात. आपण जर सजग राहिलो नाही. तर अनेकांची यामध्ये फसवणूक होऊ शकते. दुर्दैवाने सायबर गुन्हेगार आपल्यापेक्षा पुढे आहेत. कारण, त्यांच्याकडे अत्याधुनिक साधने आहेत, अशा गुन्हेगारांना नैतिकतेशी काहीही देणे-घेणे नाही असे फडणवीस म्हणाले. पूर्वी कायदा आणि सुरक्षेच्यावेळी खोटे कथानक तयार करून ते समाजमाध्यमांवर पसरवून दंगली घडविल्या जात होत्या. आम्ही ते तपासायला पाठविल्यानंतर तेथून माहिती येण्यासाठी किंवा तो संदेश थांबविण्यासाठी दोन ते तीन दिवस जात होते. तो पर्यंत येथे दंगली घडलेल्या असायच्या. त्यामुळे एक परिपूर्ण उपाय उभा करणे आवश्यक होते. त्यानुसार हे केंद्र सुरू करण्यासाठी पावले उचलल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. 14407 हा मदत क्रमांक देखील सुरू करण्यात आला असून 15 ऑक्टोबरपासून या केंद्रातील सर्व कामे पूर्ण सुरू होतील असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. - तिसऱ्यांदा करेक्ट कार्यक्रम करतो
हे गोरगरिबांचे सरकार आहे. अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे, अन्यथा एकही अधिकारी मी जागेवर ठेवणार नाही असा सज्जड दम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला. ती दोन वेळा सभांळून घेतो तिसऱ्यांदा करेक्ट कार्यक्रम करतो. हे सरकार लोकांना देणारे आहे, त्यामुळे कायदे, नियम लोकांच्या भल्यासाठी पाहिजेत. - मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजना
राज्यातील प्रत्येक महिला सुरक्षित असली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजनादेखील सुरू केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. जो मुलींबाळींकडे वाकड्या नजरेने बघेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. चुकीला माफी नाही मिळाली पाहिजे हे सरकारचे काम आहे. मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजना सुरु केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai