Breaking News
मुंबई ः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. ‘मी पुन्हा येईन,’ अशी घोषणा 2019 मध्ये केल्यानंतर मुख्यमंत्रीपद हुकलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तिसरा कार्यकाळ गुरुवारी सायंकाळपासून सुरू करुन आपला शब्द खरा करून दाखविला. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुरुवारी, 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात महायुतीच्या या त्रिमूर्तींचा भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा झाला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थितीती लावली.
महायुतीचा शपथविधीसाठी खास नवी दिल्लीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत होते. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तिसरा कार्यकाळ गुरुवारी सायंकाळपासून सुरू झाला. महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर शपथविधी मोठ्या जल्लोषात करण्यात आला असला तरी मंत्र्यांची संख्या आणि खात्यांचे वाटप यावरून तिन्ही घटक पक्षांमध्ये सहमती न होऊ शकल्याने तिघांनीच शपथ घेतली. त्यामुळे अवघ्या 20 मिनिटांत हा सोहळा आटोपला. फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले तर अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री होऊन उपमुख्यमंत्री झालेले शिंदे दुसरेच. आझाद मैदानावरील या शपथविधी सोहळ्यात 20 पेक्षा अधिक मंत्र्यांचा समावेश करण्याची मूळ योजना होती. मात्र, एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यातच बराच वेळ गेला. यामुळे मंत्र्यांची संख्या व खात्यांचे वाटप यावर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. खातेवाटपावर शिंदे अडून बसल्याने राष्ट्रवादीनेही आपली भूमिका उघड केली नाही.
या दोन्ही पक्षांशी चर्चा करून महायुतीची एकी कायम ठेवण्याचे पहिले आव्हान फडणवीस यांना पेलावे लागणार आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ या आपल्या घोषणेचा पुनरूच्चार केला. जनतेने आम्हाला भरभरून दिले आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षेचे ओझेही अधिक आहे. मात्र येत्या काळात लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. निवडणुकीच्या दरम्यान लोकांना दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता सरकार करेल. मात्र त्यापूव राज्याची वित्तीय स्थिती विचारात घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
1. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली. फडणवीस यांचे नाव शपथविधीसाठी पुकारताच एकच जल्लोष करण्यात आला आणि त्यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या, टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना सर्व मान्यवरांनी यशस्वी कारकीदसाठी शुभेच्छा दिल्या.
2. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेण्यापूव ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन, धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण, देशाचे कर्तबगार व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कणखर गृहमंत्री अमित शहा यांचा पाठिंबा व आशीर्वादाने’ मी शपथ घेत असल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला. त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला व कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या.
3. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची गांभीर्यपूर्वक शपथ घेतली. त्यानंतर उपस्थितांनी जल्लोष केला. अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन विक्रम केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai