माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 27, 2024
- 459
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वष गुरुवारी निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंग हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर 2009 साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले.
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने सारा देश शोकाकुल झाला आहे. देशभर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. 1982 ते 1985 या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं. त्यानंतर 1985 ते 1987 या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले.
सन 1991 सालाच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली.
सन 1996 साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे 13 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai