डुरक्या घोणस सापाला जीवदान

नवी मुंबई : उरण फाटा येथे शाळेच्या बाजूला असलेल्या नर्सरीमध्ये आढळून आलेल्या  डुरक्या घोणस  या विषारी सापाला पकडून त्याची पामबीच मार्गावरील जंगलामध्ये सुखरुप सुटका करण्याचे धाडस तुर्भे येथील विशाल तुपे (बाजा) नामक तरुणाने केल्याची घटना रविवारी रात्री घडली.   

रविवारी संध्याकाळी उरण फाटा येथील नर्सरीमध्ये विषारी डुरक्या घोणस साप आढळून आल्याने तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. याचवेळी विशाल तुपे या सर्पमित्राला दूरध्वनीवरुन संपर्क साधून या विषारी सापाला पकडण्यासाठी बोलवण्यात आले. यावेळी विशाल तुपे याने ताबडतोब जाऊन मनात कोणतीही भिती न बाळगता काठीच्या सहाय्याने या सापाला मोठ्या शिताफीने पकडून त्याला एका बाटलीत बंद केले. यानंतर त्याने त्या विषारी सापाला पामबीच मार्गावरील जंगलात जाऊन सोडून दिले.  विशाल तुपे या तरुणाने या विषारी सापाला पकडण्यासाठी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.