नाईकांचे समर्थक अडकणार शिवबंधनात

सुरेश कुलकर्णींसह चार नगरसेवकांचा राजीनामा

नवी मुंबई : राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या नवी मुंबई महापालिकेतील माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे चारही नगरसेवक लवकरच शिवबंधनातअडकणार आहेत. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला असून तुर्भे स्टोअर्स व एमआयडीसी परिसरावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 भाजपचे नेते आमदार गणेश नाईक यांचे विश्वासू समजले जाणारे सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी व संगीता वास्के यांनी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे राजीनामा देत असल्याचे पत्र दिले. या वेळी विरोधी पक्ष नेते विजय चौगुलेही उपस्थित होते. कुलकर्णी यांची तुर्भे स्टोअर्स, इंदिरानगर ते बोनसरीपर्यंत झोपडपट्टी परिसरावर पकड आहे. माजी मंत्री गणेश नाईक शिवसेनेत असल्यापासून ते त्यांचे समर्थक होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँगे्रस व भाजपमध्येही त्यांनी प्रवेश केला होता. त्यांनी आतापर्यंत परिवहन समिती सभापती, तीन वेळा स्थायी समिती सभापतीपद भूषविले आहे. त्यांच्या समर्थकांनाही परिवहन व इतर समित्यांवर संधी देण्यात आली होती. मागील काही महिन्यांपासून कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. तुर्भेमधील डम्पिंग ग्राउंड, ठाणे-बेलापूर रोडवर उड्डाणपूल बांधण्यात यावा या मागण्यांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते शिवसेनेत जाणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे प्रत्यक्षात गळती सुरू झाली आहे. 

कोट

तुर्भे परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविणे याला आमचे प्राधान्य असते. परिसरातील नागरिकांच्या इच्छेखातर आम्ही भाजपचा राजीनामा दिला आहे. नगरसेवक पदाचाही राजीनामा आयुक्तांकडे दिला आहे.

- सुरेश कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती