दहा कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2025
- 338
पनवेल ः नवी मुंबई पोलिसांनी मागील वर्षात 40 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले विविध अमली पदार्थ बुधवारी दुपारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीच्या भस्मीकरण यंत्रात टाकून नष्ट करण्यात आले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात काही अमली पदार्थ भस्मीकरण यंत्रात टाकण्यात आल्यानंतर इतर पदार्थ नष्ट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे हे उपस्थित होते.
नवी मुंबई पोलिसांनी मागील वषसुद्धा 39 वेगवेगळ्या गुन्ह्यांतील 1 कोटी 61 लाख रुपयांचे अमली पदार्थ याच कंपनीत भस्मीकरण यंत्रात नष्ट केले होते. याच प्रक्रियेचा भाग म्हणून पोलीस आयुक्तांनी मंत्री नाईक यांच्या उपस्थितीत अमली पदार्थ नष्ट करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. नवी मुंबई पोलिसांनी मागील 2 वर्षात हस्तगत केलेल्या 56 कोटी रुपयांच्या अमली पदार्थाच्या साठ्यामधून 10 कोटी रुपयांच्या अमली पदार्थाची होळी प्रातिनिधिक स्वरूपात तळोजा येथे केली.
नशामुक्त शहर अशी घोषणा करणारे आणि त्या घोषणेनुसार अमलीपदार्थ विरोधात जोरदार कारवाई करुन परिसर नशामुक्त करण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याने नवी मुंबई हे राज्यातील पहिले शहर ठरले असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. नशामुक्ती नवी मुंबई अभियानाला सुरुवात केल्यानंतर नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद जी भारंबे यांच्या नेतृत्वात कारवाई प्रभावीपणे सुरू आहे. ज्या प्रकारे पोलिसांच्या सतर्कतेमुळे तसेच जनजागृती मुळे अमली पदार्थ जप्त करून नष्ट केले जात आहेत त्यावरून मला विश्वास आहे की निश्चित एक न एक दिवस भारत नशामुक्त होईल असे नाईक यावेळी म्हणाले.
- अमली पदार्थविषयक 1143 गुन्हे
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून मागील सव्वा दोन वर्षांत अमली पदार्थ विक्री, सेवन करणाऱ्यांविरोधात सर्वाधिक गुन्हे नवी मुंबई पोलिसांनी नोंदवले. 2023, 2024 या दोन्ही वर्षांत अमली पदार्थविषयक 1143 गुन्हे नोंदवले. यामध्ये 1743 संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली. 56 कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. - आफ्रिकन नागरिकांनकडून 38 कोटींचे ड्रग्ज जप्त
अटकेतील 111 नागरिक हे आफ्रीका देशातील आहेत. आफ्रिकन देशातील नागरिकांकडून 38 कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आले. पोलीस आयुक्त भारंबे यांनी नशामुक्त नवी मुंबई शहर करण्यासाठी पोलीसांना निर्देश दिल्यामुळे कारवाईमध्ये सातत्य आहे. नागरिकांना अमली पदार्थांविषयी माहिती देण्यासाठी 8828-112-112 यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलीसांना अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांचे जाळे उद्धवस्त करण्यात आतापर्यंत तरी यश आले आहे. पोलिसांकडून अमलीपदार्थ विरुद्धची कारवाई सातत्याने सुरूच राहणार आहे.- मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai