Breaking News
दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
उरण ः विविध योजनेच्या माध्यमातून विविध आमिष, प्रलोभने दाखवून उरण तालुक्यातील अनेक नागरिकांची फसवणुक केली आहे. तालुक्यातील धाकटी जुई येथील रेशमा अमित घरत, सुजाता मनोज घरत महिलांनी गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची 85,60,000 रुपयाची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रककरणी त्यांच्यावर आर्थिक फसवणूकी संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
उरण तालुक्यातील पागोटे, जेएनपीटी येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे सुजित हसुराम तांडेल यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. त्यांची पत्नी हर्षाली सुजित तांडेल हिची वर्ग मैत्रीण रेशमा घरत हिचे मागील तीन वर्षापासून हर्षाली तिच्या घरी येणे जाणे होते. त्या दरम्यान हर्षाली हिने आपले पती सुजित तांडेल यांना माझी मैत्रीण रेशमा घरत तिच्याकडे एक व्यवसायाची योजना आहे असे सांगितले. त्याप्रमाणे सुजित तांडेल यांनी रेश्मा घरत यांच्याकडून ती योजना समजून घेतली. तिच्याकडे असलेल्या या व्यवसायाच्या योजनेत जर वीस लाख रुपये गुंतवले तर त्या मोबदल्यात रेश्मा घरत ही दोन महिन्याला एक लाख रुपये परतावा देईल, तसेच एक वर्षानंतर मी गुंतवलेली मुद्दल वीस लाख रुपये व त्यावरील परतावा सात लाख असे एकूण सत्तावीस लाख रुपये देण्याचे आमिष दिले. त्याप्रमाणे रेश्मा हिच्या म्हणण्यानुसार तिच्यावर विश्वास ठेवून सुजित तांडेल यांनी 06 ते 15 डिसेंबर 2023 दरम्यान वेळोवेळी रोख रक्कम तसेच बँकेच्या ट्रान्सफर मार्फत एकूण वीस लाख रुपये दिले. मात्र वारंवार दिलेले पैसे परत देण्याची विनंती करून सुद्धा सुजित तांडेल यांना आपले 20 लाख रुपये मिळाले नाहीत. उलट धाकटी जुई गावचे रेशमा घरत, सुजाता घरत यांनी सुजित तांडेल यांना दमदाटी करत धमकी दिली. माझेकडे आत्ता पैसे नाहीत. तुम्ही माझ्याकडे वारंवार येऊ नका. नाहीतर मी तुमच्यावर महिलेला घरी येऊन त्रास देता अशी पोलीस ठाण्यात तक्रार देईन अशी सदर महिलेने सुजित तांडेल व हर्षाली सुजित तांडेल यांना धमकी दिली. या घटनेने सुजित तांडेल व त्यांच्या परिवाराला खूप मोठा धक्का बसला. वारंवार पैशाची मागणी करून सुद्धा पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तांडेल यांनी उरण पोलीस ठाण्यात जाऊन आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी रेशमा घरत, सुजाता घरत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तसेच भुमिका परेश गावंड वय 38 वर्षे, पत्ता मु. बोरखार, हीला रेशमा व सुजाता या दोघींनी स्वस्तामध्ये उलवे नोड, नवी मुंबई येथे फ्लॅट घेउन देतो असे अमिष देवुन तिच्याकडुन 40,00,000 रूपये रक्कम स्विकारून त्यामोबदल्यात तिला फ्लॅट दिला नाही तसेच तिची रक्कम देखील परत न करता आर्थिक फसवणुक करून सदर रक्कम परत मागितल्यास त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली असल्याचे बाब समोर आली आहे. तसेच परी नंदकिशोर घरत वय 30 वर्षे, व मालती घरत दोघीही राहणार हनुमान मंदीराजवळ धाकटी जुई, यांना सुजाता घरत हीने ती डंपर व जेसीबी व्यवसायासाठी घेणार असुन सदर व्यवसायासाठी तिच्याकडे रक्कम गुंतवली तर त्या मोबदल्यात तीन महीन्यात 5 टक्के परतावा व मुद्दल परत मिळेल असे अमिष देउन त्यांचेकडुन एकूण 25,60,000 रू. रोख रक्कम स्विकारून त्यामोबदल्यात त्यांना व्यवसायातील परतावा तसेच त्यांची मुद्दल देखील परत न देता फसवणुक केल्याचे देखील बाब समोर आली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत तानाजी शेंडगे करीत आहेत. रेशमा घरत, सुजाता घरत यांनी कोणाचेही आर्थिक फसवणूक केल्यास उरण पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन उरण पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai