107 बेवारस वाहनांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 22, 2025
- 243
88 हजार दंडात्मक शुल्क वसूली
नवी मुंबई ः शहरातील स्वच्छतेला बाधा पोहचविणाऱ्या बेवारस वाहनांविरुध्द पालिकेने विशेष मोहीम हाती घेऊन 10 ते 16 मार्च 2025 या आठवड्याभराच्या कालावधीत 66 दुचाकी व 34 चारचाकी आणि 7 रिक्षा/टेम्पो अशी 107 विविध प्रकारची बेवारस वाहने उचलून घेण्यात आली आहेत. या मोहीमेबद्दल नागरिकांकडून मोठया प्रमाणावर समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून रस्त्याच्या कडेला तसेच पदपथावर वाहने उभी असल्याने त्याठिकाणी रस्ते व पदपथ सफाई करणे शक्य होत नाही. काही वाहने तर अनेक दिवसांपासून उभी असल्याने त्यावर धुळीचे लोट चढलेले दिसून येतात. या वाहनांचे मालक, चालक यांच्याकडून त्यांची निगा राखली जात नसल्याचे तसेच दखल घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र यामुळे सुनियोजित व स्वच्छ शहर असा लौकिक असणाऱ्या नवी मुंबई शहर स्वच्छतेला बाधा पोहचत असल्याचे दिसून येते.याबाबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत अशा बेवारस वाहनांवर कारवाईचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे यांच्या मार्फत आठही विभाग कार्यालयाच्या सहा.आयुक्त यांना बेवारस वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले होते.
यानुसार विभाग कार्यालयामार्फत आपापल्या क्षेत्रात रस्त्यांवर, पदपथांवर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांचे सर्वेक्षण करण्यात आले व त्या परिसरामध्ये सदर बेवारस वाहने ज्यांची आहेत त्यांनी घेउुन जावीत असे आवाहन करण्यात आले. त्यानंतरही उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर नोटीसा चिटकविण्यात आल्या. या नोटीसांनाही प्रतिसाद न देणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करीत ही वाहने टोईंगव्दारे उचलून कोपरखैरणे से.14 येथे नेण्यात आली.
विभाग वाहने दंड
- बेलापूर 13 रु.4500
- नेरुळ 7 रु.6000
- वाशी 18 रु.6000
- तुर्भे 17 रु.63000
- कोपरखैरणे 22 रु.1000
- घणसोली 12 रु.4500
- ऐरोली 17 रु.3000
- दिघा 13
कोपरखैरणे येथे उचलून नेण्यात आलेली सर्व 107 वाहने यांच्यावर नोटीसा चिटकविण्यात आल्या होत्या. तथापि नोटीसांना प्रतिसाद न दिल्याने ही वाहने उचलून नेण्यात आली. कोपरखैरणे येथे वाहने जमा केल्यानंतर ती सोडविण्यासाठी आलेल्या वाहन मालकांकडून त्या वाहनाची कागदपत्रे तपासून व रितसर दंडात्मक शुल्क आकारुन ते वाहन संबधितांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वाहन ताब्यात देताना त्यांनी ते योग्य ठिकाणी ठेवावे असेही त्यांना निर्देशित करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai