फेसबुकद्वारे बदनामी करणार्‍यावर गुन्हा

नवी मुंबई : सीवूड्स परिसरात राहणार्‍या एका मध्यमवयीन महिलेच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून बदनामी करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर सेल करीत आहे.

सीवूड्स परिसरात राहणार्‍या एका महिलेच्या मैत्रिणीच्या लक्षात हा प्रकार आला. तिने फिर्यादी महिलेस याबाबतची माहिती दिली असता तिने याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेच्या नावाने फेसबुक खाते उघडून तिचा फोटो त्यात टाकून शरीर संबंधांसाठी आवाहन करण्यात आले होते. यासाठी फोटो जरी फिर्यादीचा टाकण्यात आला तरी संपर्क क्रमांक मात्र फिर्यादी महिलेच्या आईचा देण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकार माहितीतील व्यक्तीने केलेला असावा असा कयास पोलिसांनी काढला आहे. तसेच, फिर्यादी महिलेसोबत काम करणार्‍या काही व्यक्तींबाबत संशय व्यक्त केला आहे. हे प्रकरण सायबर सेल कडे वर्ग करण्यात आले असून त्या दिशेने तपास सुरु आहे.