प्रसूती तज्ज्ञ सेवेत रूजू

पनवेल ः बहुचर्चित पनवेल उपजिल्हा रूग्णालयाच्या सेवेत डॉ. श्‍वेता संजय राठोड रूजू झाल्याने गरोदर महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाळंतपणासाठी उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने विशेषतः सिझरीनसाठी अन्यत्र रूग्णाला पाठवावे लागत होते. त्या गंभीर समस्येपासून उपजिल्हा रूग्णालयाची मुक्तता झाली आहे. पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली असून आणखी दोन डॉक्टर आणण्यासाठी संघर्ष समितीची धडपड सुरू आहे.

 पनवेल उपजिल्हा रूग्णालयात प्रसूती डॉक्टर उपलब्ध नसल्याने गरोदर महिला त्यात प्रसूतीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत होता. सिझरीन करण्यासाठी डॉक्टर नसल्याने अवघडलेल्या परिस्थितीत रूग्णांना दुसरीकडे पाठवावे लागत होते. त्यामुळे 120 खाटांच्या अलिशान आणि अत्याधुनिकतेचा साज दिलेल्या उपजिल्हा रूग्णालयाबाबत नागरिकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केले जात होते.

 दरम्यान, पनवेल उपजिल्हा रूग्णालयातून प्रतिनियुक्तीवर अन्यत्र पाठविलेले 5 वैद्यकीय अधिकारी पुन्हा आल्यानंतर लगेचच प्रसूती तज्ञांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, संचालिका डॉ. साधना तायडे, उपसंचालिका डॉ. गौरी राठोड आदींकडे पाठपुरावा करून तीन वैद्यकीय अधिकार्‍यांसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यातून डॉ. स्वाती नाईक (आसूडगाव, खांदा कॉलनी) यांचा प्रस्ताव आदेशाकरीता आरोग्य मंत्रालयात अंतिम टप्यात आहे. त्या आरोग्य सेवेत असताना हक्काच्या दीर्घ मुदतीच्या रजेवर असल्याने त्यांना  पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यासाठी संघर्ष समितीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. दरम्यान, व्यास यांच्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी 12 फेबु्रवारीला डॉ. श्‍वेता राठोड यांची प्रसूती तज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे. त्या उपजिल्हा रूग्णालयाच्या सेवेत दोन दिवसांपूर्वी रूजू झाल्या आहेत.