Breaking News
नवी मुंबई : तळोजा येथील पेंधर येथील सोनम केणी या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या चार वर्षाच्या मुलीची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची घटना गत एप्रिल महिन्यात घडली होती. सदर घटना घडुन 40 दिवस उलटुन गेल्यानंतर देखील तळोजा पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. त्यामुळे मृत सोनमच्या नातेवाईकांनी बुधवारी सकाळी भर पावसात तळोजा पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढुन ठिय्या आंदोलन केले. तसेच आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
तळोजा भागातील पेठाली गावात राहणाऱ्या सोनम अभिषेक केणी या विवाहितेला सलग तीन मुली झाल्याने वंशाला दिवा हवा यासाठी तिचा सासरकडून छळ करण्यात येत होता. मुलगा होण्यासाठी तांत्रिक मांत्रिक तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला मुगाची डाळ भात व पपई सलग वर्षभर खाण्यासाठी देण्यात येत होते. तसेच तिला मानसिक त्रास देऊन टोमणे मारुन तिचा छळ करण्यात येत होता. अखेरीस सोनमने आपल्या मुलीची हत्या करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपुव सोनमने लिहून ठेवलेली आठ पानाची चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून त्यात तिने तिच्यावर सासरकडील मंडळीकडुन होत असलेल्या मानसिक आणि शारीरीक छळ होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर तळोजा पोलिसांनी सोनमचा पती अभिषेक केणी, सासु प्रभावती केणी, नणंद हर्षदा पाटील, वैशाली पाटील, अर्चना घरत व रुपाली माळी या सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना घडून 40 दिवस उलटून गेल्यानंतर देखील पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. त्यामुळे तळोजा पोलिसांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी बुधवारी मृत सोनमच्या नातेवाईकांनी तळोजा पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला. या निषेध मोर्चामध्ये पेंधर गावातील ग्रामस्थ तसेच विविध पक्षाचे नेते व प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आरोपींना अटक करुन सोनमला न्याय देण्याची मागणी केली. या मोर्चामुळे तळोजा पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai