आयुक्तांकडून शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 20, 2025
- 347
नवी मुंबई ः तीन दिवसांपासून सुरु असलेला पर्जन्यवृष्टीचा जोर दि. 17 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्रीपासून अधिक वाढला असून पालिकेची यंत्रणा दक्षतेने कार्यरत असल्याने नवी मुंबईत कोठेही अडचणीचा प्रसंग उद्भभवलेला नाही. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबईत विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देत परिस्थितीची पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या.
17 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 ते 18 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 पर्यंत नवी मुंबई क्षेत्रात 115.17 मिमी पावसाची नोंद झालेली असून सकाळी 8.30 पासून सायं. 5.30 पर्यंत सरासरी 83.68 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यापुर्वी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 ते 16 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 पर्यंत सरासरी 134.68 मिमी. आणि 16 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 ते 17 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 पर्यंत सरासरी 105.70 मिमी. पावसाची नोंद झालेली आहे. आयुक्तांनी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासमवेत प्राधान्याने समुद्राकाठी असणाऱ्या वाशीगाव व परिसराची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शहरातील इतर भागांनाही भेटी देत तेथील स्थितीची पाहणी केली.
खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना 18 व 19 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली. से.21, एपीएमसी मार्केट रस्ता तसेच सानपाडा-जुईनगर येथील अंडरपास, से 5 आणि से 7 ऐरोली येथील अष्टदर्शन सोसायटी समोरील रस्ता अशा ठिकाणी काही काळ पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने तेथे जादा पाणी उपसा पंप कार्यान्वित करण्यात आले. तसेच त्याठिकाणच्या रस्ते व गटार यामधील वॉटरएन्ट्रीवर जमा झालेले अडथळे दूर करून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करुन देण्यात आली. एमआयडीसी क्षेत्रातही रबाळे भागात पाणी उपसा पंपाव्दारे रस्त्यावर साचलेले पाणी काढून टाकण्यात आले. पावसाची संततधार सुरू असल्याने वाहतुक सकाळी व दुपारी वाहतुक मंद गतीने सुरू होती.
भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत ठाणे जिल्ह्याला 18 व 19 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून 20 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेसह महापालिका क्षेत्रातील इतरही प्राधिकरणांना दक्ष राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले असून विशेषत्वाने अतिवृष्टी व भरतीच्या काळात नवी मुंबईच्या भौगोलिक स्थितीमुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्य ठिकाणी आवश्यक यंत्रसामुग्री व यंत्रणा अधिक कृतीशीलतेने दक्ष राहतील याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मागील 3 दिवस प्रत्येक दिवशी दररोज सरासरी 100 ते 125 मिमी पर्जन्यवृष्टी होऊनही इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई शहरातील जनजीवन सुस्थितीत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai