विशेष नगर वसाहतींचा ठामपाला करोडोंचा चुना
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 07, 2026
- 42
घनकचरा प्रकल्पाला बगल; पालिका उचलते कचरा
ठाणे ः विशेष नगर वसाहत अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी संबंधित प्रकल्प प्रवर्तकांची असतानाही ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील संबंधित विशेष नगर वसाहतीतून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट पालिकेचा घनकचरा विभाग लावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नगरसेवक दिपक जाधव यांनी याबाबत प्रश्न विचारला असता पालिकेकडून यास दुजोरा देण्यात आल्याने पालिकेला आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात माजिवडे येथे रुस्तमजी समुह तसेच मौजे कोलशेत व कावेसर येथील हिरानंदानी समुहाच्या विशेष नगर वसाहतींना 2010 साली मंजुरी देण्यात आली आहे. विशेष नगर वसाहती नियमांनुसार प्रकल्पामधील घनकचऱ्याचे संकलन, प्रक्रिया आणि विल्हेवाट ही संपुर्ण जबाबदारी संबंधित प्रकल्प प्रवर्तकाची असून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट संबंधित गृहसंकुलातच लावणे बंधनकारक आहे. असे असतानाही प्रत्यक्षात मात्र या दोन्ही गृहसंकुलात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट महापालिकेतर्फे होत असल्याचे नगरसेवक दिपक जाधव यांनी उघडकीस आणले आहे.
नगरसेवक दिपक जाधव यांनी जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेत रुस्तमजी व हिरानंदानी गृहसंकुलातून प्रतिदिन उचलण्यात येणाऱ्या कचऱ्याची माहिती व सदर कचरा उचलण्यासाठी किती घंटा गाड्यांचा वापर करण्यात येतो याबाबत घनकचरा विभागाकडे माहिती मागितली होती. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार रुस्तमजी टाऊनशिपमधून दररोज 10 ते 12 मेट्रिक टन कचरा उचलला जातो. त्यासाठी दररोज पाच फेऱ्या मारल्या जात असून प्रत्येक फेरीस सुमारे 8,484 रुपये खर्च येतो. तर हिरानंदानी टाऊनशिपमधून दररोज 28 ते 30 मेट्रिक टन घनकचरा उचलला जात असून सात फेऱ्या मारल्या जातात. प्रत्येक फेरीवर सुमारे 6,923 रुपयांचा खर्च होत असल्याची माहिती जाधव यांना प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही गृहसंकुलांची उभारणी झाल्यापासून महापालिकाच ही सेवा पुरवत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
- सर्व खर्च प्रकल्प प्रवर्तकांकडून वसूल करा
नियमांनुसार घनकचऱ्याची विल्हेवाट संबंधित टाऊनशिपमध्येच लावणे बंधनकारक असताना पालिकेला मोठा भुर्दंड सदर वाहतुकीसाठी नाहक सोसावा लागत असल्याने आतापर्यंत झालेला सर्व खर्च संबंधित प्रकल्प प्रवर्तकांकडून वसूल होणे गरजेचे असल्याचे नगरसेवक दिपक जाधव यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना सांगितले. दरम्यान, जागृत नगरसेवक जाधव यांनी आवाज उठवल्यानंतर आता पालिका प्रशासन कोणती भुमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. - विशेष नगर वसाहत नियमात घनकचरा व्यवस्थापन ही प्रकल्प प्रवर्तकाची जबाबदारी असताना आजपर्यंत राज्यातील कोणत्याही नियोजन प्राधिकरणाने त्याकडे लक्ष दिलेले नाही. घनकचरा विल्हवाट लावण्यासाठी नगर वसाहतीत जागा सुनिश्चित करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai