शाळांमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 13, 2025
- 119
नवी मुंबई ः महापालिकेच्या वतीने 3 ऑक्टोबर रोजीच्या अभिजात मराठी भाषा दिवसापासून 9 ऑक्टोबरपर्यंत अभिजात मराठी भाषा सप्ताह अत्यंत उत्साहात विविध उपक्रमांचे आयोजन करीत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यामध्ये मराठी भाषा व साहित्यप्रेमी नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
या शहर स्तरावरील कार्यक्रमांप्रमाणेच शासन परिपत्रक 21 जुलै 2025 नुसार नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी सूचित केल्याप्रमाणे शहरातील महारपालिकेच्या शाळांप्रमाणेच सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्येही 3 ते 9 ऑक्टोबर कालावधीत वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काही शाळांमध्ये वाचनालयातील पुस्तकांचे प्रदर्शन शालेय स्तरावर भरविण्यात आले होते. यानिमित्त पालकांनाही शाळेत बोलवून विविध लेखकांची माहिती देण्यात आली, मान्यवर लेखकांच्या पुस्तकांची माहिती देण्यात आली तसेच ज्ञानात भर घालण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या मराठी पुस्तकांच्या वाचनासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्याचप्रमाणे हस्ताक्षर हा व्यक्तिमत्वाचा आरसा असतो हे लक्षात घेत शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवर सुंदर हस्ताक्षराचा संस्कार व्हावा व ही त्यांची सवय होऊन जावी यादृष्टीने अक्षर हे सुरेख व सुवाच्च असले पाहिजे हे लक्षात घेत ‘हस्ताक्षर कसे सुधारावे’ तसेच ‘शुद्धलेखनाच्या नियमां’बाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांमार्फत विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता वाचून दाखवण्याचा उपक्रमही शालेय स्तरावर घेण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध कवींच्या कविताही शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी तसेच काही पालकांनीही वाचून दाखविल्या. विद्यार्थ्यांच्या कवितांच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. अशाच प्रकारे शालेय स्तरावर इयत्तानिहाय कथावाचन व कवितागायन सामुहिक स्तरावर घेण्यात आले. या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे समुहाने कविता गायनाचा आनंद लुटला.काही शाळांमध्ये इयत्ता सातवी व आठवीच्या वर्गांकरिता वाक्यप्रचार, म्हणी यांची अंताक्षरी असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा व संवर्धन व्हावे त्याचप्रमाणे मराठी भाषा परस्पर संवादातून टिकून राहावी याकरिता पालकांना मराठी भाषेतून व्यवहार करण्याबाबत पालक सभेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही मराठी भाषा बोलणे आवश्यक असल्याचे पटवून देत शुध्द भाषा उच्चारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये विविध उपक्रमांच्या आयोजनातून नवी मुंबईतील शाळाशाळांमध्ये मराठी भाषेचा जनजागर करण्यात आला. विशेष म्हणजे यात विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांनाही सहभागी करून घेत व्यापक स्वरूपात अभिजात मराठी भाषेचे महत्व पटवून देण्यात आले व तिच्या विकासासाठी प्रत्येकाने कर्तव्य म्हणून आपले योगदान द्यायला हवे याचे महत्व सांगण्यात आले अशी माहिती शिक्षणाधिकारी सुलभा बारघरे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai