बेकायदेशीर कॉल सेंटर केले सील
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 52
17 जणांना अटक; 7 कोटींची फसवणुक
नवी मुंबई : सट्टा बाजारात गुंतवणूकीवर कमी कालावधीत मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून सामान्य जणांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महापे येथे बेकायदेशीर कॉल सेंटर वर सायबर पोलिसांनी धाड टाकून त्याला सील ठोकले आहे. या प्रकरणी 17 जणांना अटक करण्यात आली असून इतर 7 जणांचा शोध सुरु आहे. तर चार जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सर्व आरोपी हे 21 ते 49 वयोगटातील असून त्यात तरुणांचा भरणा अधिक आहे. आपण काय करतो याची जाणीव संशयित आरोपींना असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच कॉल सेंटर नेमके कोण चालवते, मालक कोण याबाबत सखोल तपास सुरु आहे. गेल्या काही महिन्यापासून सट्टा बाजारात आमच्या सल्ल््याने गुंतवणूक करा कमी कालावधीत दुप्पट चौपट परतावा मिळेल अशा आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्याच्या गुन्ह्यात वाढ होत होती. हा प्रकार नक्की कुठून चालतो याचा शोध सायबर पोलीस घेत होते. त्यातच त्यांना एक माहिती मिळाली. त्यानुसार नवी मुंबई लगत असणाऱ्या ठाणे बेलापूर या औद्योगिक पट्ट्यात असणाऱ्या महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्क येथील इमारत क्रमांक तीन तिसऱ्या माळ्यावर एक कॉल सेंटर सुरु आहे. या माहितीशी शहानिशा गुप्त पद्धतीने करण्यात आल्यावर या कॉल सेंटरला कुठलीही परवानगी नाही. तसेच येथून सट्टा बाजारात भरघोस परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते असेलही काही तांत्रिक पुरावे जोडण्यात आले. योजनाबद्ध रित्या मंगळवारी रात्री या कॉल सेंटर वर धाड टाकण्यात आली. त्यावेळी उपस्थित सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या वर बेकायदेशीर रित्या कॉल सेंटर चालवणे, नागरिकांची फसवणूक करणे, नागरिकांची माहिती अनधिकृत रित्या प्राप्त करणे आणि आर्थिक फसवणूक करणे या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार हे कॉल सेंटर 1 जानेवारी 2025 पासून सुरु आहे. तसेच संगणक व अन्य तांत्रिक तपास जो आता पर्यंत करण्यात आला त्यानुसार सामान्य नागरिकांची 7 कोटी 1 लाख 11 हजार 401 रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र हा तपास अद्याप पूर्ण झाला नसून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai