वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रयत्नशील
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 30
प्रभावी उपाययोजना करण्याचे पालिका आयुक्त शिंदे यांचे निर्देश; बांधकाम साईट्सची प्रत्यक्ष पाहणी
नवी मुंबई ः नवी मुंबईच्या पर्यावरणाकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने वायू प्रदूषणावर प्रतिबंध आणण्याकरिता बांधकाम साईट, दगड खाणी, सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्लान्ट याकडे प्राधान्याने लक्ष दयावे व त्यासोबतच वाहनांमुळे होणारे प्रदूषण, तंदूर भट्टयांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यासाठीही प्रयत्न करावेत असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले.
थंडीमुळे व वायू प्रदूषणामुळे हवेतील धुरके वाढले असून ते कमी होण्यासाठी सतर्कता राखत ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज विशद करीत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शहरात सुरु असलेल्या बांधकाम साईट्सवर धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपरणे राबविल्या जात असल्याची प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी व त्यामध्ये त्रुटी आढळल्यास साईटवरील बांधकाम आठवडयाभरासाठी बंद करावे असे निर्देश दिले. याकरिता नगररचना विभाग व विभाग कार्यालयातील अभियंत्यांनी आपापल्या क्षेत्रातील बांधकाम साईट्सवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व त्याचा अहवाल जलद सादर करावा असे निर्देशित केले. रस्त्यांच्या कडेची माती साफ करण्याची प्रक्रिया दर 15 दिवसांनी राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कॉरी साईट्स व सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्लांट याठिकाणीही प्रदूषण प्रतिबंधाचे नियम पाळले जात असल्याची प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करावी व अहवाल दयावा असे आयुक्तांनी निर्देशित केले. अशाच प्रकारे बेकरीत कोळशाचा वापर होत असेल तर तो बंद करावा तसेच तंदूरसाठी हॉटेलमध्ये होणाऱ्या कोळशाच्या वापरासही प्रतिबंध करावा, त्याचप्रमाणे कुठे कचरा जाळला जात असेल तर त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे आयुक्तांनी सूचित केले.
दैनंदिन स्वच्छतेमध्ये गावठाणातील कचरा संकलनाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्याकडे गावठाणांच्या कार्यक्षेत्राची जबाबदारी सोपवून गावांच्या अंतर्गत भागातील कचरा संकलन कसे होईल याचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बायलेन स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. हा पानगळतीचा ऋतू असल्याने पानांचा कचराही गोळा केला जावा व तो कुठल्याही परिस्थितीत जाळला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे या हरित कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी उदयानातील चारही कोपऱ्यात कंपोस्ट पीट असावेत असे आयुक्तांनी निर्देश दिले. पर्यावरण संरक्षरणाच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेतर्फे बनविण्यात आलेल्या गॅस शवदाहिनी व विदयुत शवदाहिनी वापरात आणून स्मशानभूमीतही पर्यावरणपूरक संकल्पना राबवावी व त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करावे असे आयुक्तांनी सूचित केले.
बेघर व फेरीवाले ही मोठी समस्या असून सातत्याने कारवाई करणे हाच प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम सुरु असलेल्या अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई प्रभावीपणे राबवावी तसेच विनापरवानगी बॅनर व पोस्टर्सवरही कायदेशीर कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. नागरी सेवा सुविधांबाबत अभियांत्रिकी विभागाला स्पष्ट निर्देश देताना कामाची गरज लक्षात घेऊनच सुविधा काम प्रस्तावित करावे असे आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे बांधकामाच्या दर्जाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
15 दिवसांत रस्ते खड्डेमुक्त करा
विविध सेवा पुरविण्यासाठी रस्ते खोदले जातात या बाबीकडे गंभीर लक्ष देत नव्याने निर्मिती झालेला रस्ता कोणत्याही कारणासाठी खोदला जाणार नाही असे स्पष्ट करीत कोणत्याही कारणासाठी रस्ता खोदण्यासाठी आयुक्तांची परवानगी घ्यावी असेही त्यांनी सांगितले. खड्डेमुक्त रस्ते हे आपले प्राधान्याने लक्ष्य असून त्यादृष्टीने सुरु असलेल्या कामांना वेग दयावा आणि पुढील 15 दिवसांत हे काम पूर्ण करुन तसा अहवाल सादर करावा असे सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निर्देश देण्यात आले. नवी मुंबईची पर्यावरण स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्राधान्याने वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याकडे काटेकोर लक्ष दयावे असे निर्देशित करतानाच नागरिकांमध्येही पर्यावरणविषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यादृष्टीने काळजी घेण्यासाठी जनजागृती करण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून निर्देश देण्यात आले.
साईटवरील बांधकाम आठवडयाभरासाठी बंद करावे
प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळल्यास साईटवरील बांधकाम आठवडयाभरासाठी बंद करावे असे निर्देशित केले होते. नगररचना विभागातील अभियंते आणि विभाग कार्यालयातील अभियंते यांना बांधकाम साईट्सची क्षेत्रे नेमून देण्यात आली असून त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन वायू व ध्वनी प्रदूषण विषयक उपाययोजना व्यवस्थितरित्या राबविल्या जात असल्याची खातरजमा केली जात आहे. अशाच प्रकारे विभाग कार्यालय स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या पथकांव्दारे दगडखाणी, सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्लान्ट, कोळशाचा वापर करणाऱ्या बेकरी व तंदूर भट्ट्या यांचीही तपासणी करण्यात येत आहे. दंडात्मक कारवाई तसेच ‘काम बंद’ कारवाई टाळण्यासाठी सर्व विकासक, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि प्रकल्प प्रवर्तक यांनी ‘मानक कार्यप्रणाली’ मधील उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करावी.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai