शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीची हेल्पलाईन
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 32
मुंबई : शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी एसटी महामंडळाची 1800 221 251 या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्यभरातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी एसटी महामंडळ बस फेऱ्या उपलब्ध करून देत असते. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना घरातून शाळेला जा-ये करण्यासाठी मासिक पासमध्ये 66.66 टक्के सवलत दिली जाते. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो. मंत्री सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली असता, तेथे उपस्थित असणाऱ्या शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींनी अनेक समस्या व तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना घरुन शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे, तांत्रिक बिघाडामुळे बस नादूरूस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एसटीच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून मदत मिळावी, या हेतूने 1800 221 251 हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. या क्रमांकावर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देता येईल, त्याचबरोबर, संबंधित शाळा, महाविद्यालयांना 31 विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दुरध्वनी संपर्क क्रमांक देण्यात येत आहेत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी देखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडू शकतात.
विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. त्याचप्रमाणे, सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5-6 या वेळेत मुख्य बसस्थानक व ज्या ठिकाणी विद्यार्थी चढ-उतार जास्त होते, अशा थांब्यावर संबंधित आगाराच्या पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे. शाळेचा शेवटचा मुलगा अथवा मुलगी बसने सुखरूप घरी जाईपर्यंत संबंधित पर्यवेक्षकांनी तेथून हलू नये, अशा स्पष्ट सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत. शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार संबंधित विद्यार्थी अथवा विद्यार्थिनींनी तसेच संबंधित शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी केल्यास जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, असे निर्देशही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai